पुणे : कोल्हापूर जिल्ह्यात गाजलेल्या ‘खून का बदला खून’ या बांदिवडेकर घराण्यातील व संबंधित असे एका पाठोपाठ ९ खून प्रकरणातील मुख्य सुत्रधार डॉ. प्रकाश साताप्पा बांदिवडेकर याने पुण्यातील कुख्यात गुंड गज्या मारणे टोळीशी संधान बांधले असल्याचे व पुण्यात आपले जाळे निर्माण करण्याच्या प्रयत्नात असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
शेअर ट्रेडिंगमध्ये नुकसान झाल्याने ४ कोटी रुपयांच्या बदल्यात २० कोटी रुपयांची खंडणी मागून व्यावसायिकाचे अपहरण करुन त्याला जीवे मारण्याची धमकी देण्याच्या प्रकरणात पुण्याच्या गुन्हे शाखेने डॉ. प्रकाश बांदिवडेकर याला इंदूरमध्ये अटक केली आहे.
या व्यावसायिकाचे गज्या मारणे टोळीने अपहरण केल्यानंतर प्रकाश बांदिवडेकर याने फोन करुन त्याला धमकावले होते. याची माहिती मिळाल्यावर पोलीस पथक बांदिवडेकर याचा शोध घेत होते. त्याची चाहूल लागल्यावर तो कोल्हापूरहून पसार झाला होता. तो मध्य प्रदेशातील इंदूर येथे असल्याची माहिती मिळाल्यावर एक पथक इंदूर येथे पाठविण्यात आले. त्यांनी बांदिवडेकर याचा शोध घेऊन त्याला अटक केली.
प्रकाश बांदिवडेकर याच्यावर १९९८ पासून चंदगड पोलीस ठाण्यात ८, बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्यात ३ आणि गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात एक असे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, फसवणूक, सरकारी कामात अडथळा यांचा समावेश आहे. १९९८ मध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये डॉ. बांदिवडेकर याला जन्मठेप व १० हजार रुपयांची शिक्षा झाली आहे. तसेच १९९२ व २०१२ मधील गुन्ह्यातून त्याची निर्दाेष सुटका झाली होती. अन्य गुन्हे न्यायप्रविष्ट आहेत.