मुंबई : देहू येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना भाषण करण्याची संधी देण्यात आली नाही. त्याउलट भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते. शिवाय, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील नाराजी व्यक्त होत आहे. परंतु, आता याबाबत भाजपानेच ट्विट करून खुलासा केला आहे. देहुतील कार्यक्रम सरकारी नव्हता, खासगी होता, असे भाजपाने म्हटले आहे.
दरम्यान, देहुतील कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्याच्या लोहगाव विमानतळावर आगमन होताच त्यांनी स्वागतासाठी आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवला. त्यानंतर दोघेही देहू येथील कार्यक्रमासाठी गेले. मात्र, कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी देण्यात आली नाही. यावेळी भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनोगत व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते यावर नाराजी व्यक्त करत आहेत. प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्यांना भाषणाची संधी अपेक्षित असताना त्यांना वंचित ठेवले. त्यांचे नाव दिल्लीतूनच कापण्यात आले अशी चर्चा सुरू आहे. तसेच, हा महाराष्ट्राचा अपमान असल्याची भावना खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. तर, अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री आहेत, याचे भान पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना असायला हवे होते, या शब्दांत आमदार अमोल मिटकरी यांनी खंत व्यक्त केली होती.
भाजपाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, देहू येथील कार्यक्रम हा सरकारी नव्हता, तर खासगी होता. प्रोटोकॉल हा सरकारी कार्यक्रमाला असतो, खाजगी कार्यक्रमाला नाही. याशिवाय स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजित पवारांना भाषण करण्याची विनंती केली. पण, त्यांनी नकार दिला.
भाजपाने राष्ट्रवादी समर्थकांना टोला लगावताना म्हटले आहे की, नरेंद्र मोदी यांच्या तीन कार्यक्रमांपैकी दोन कार्यक्रमात फडणवीस यांचे भाषण झाले नाही, पण भाजपाने कोणताही आक्रस्ताळेपणा केला नाही. कारण, भाजपासाठी वारकरी, स्वातंत्र्य सेनानींचे स्मारक, एका वृत्तपत्राची द्विशताब्दी हे विषय महत्त्वाचे आहेत, स्वत:चा अहंकार नाही.
अजित पवार यांना देहुतील कार्यक्रमात भाषणापासून वंचित ठेवल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकारावर सदाभाऊ खोत यांनीही अमोल मिटकरी यांना मेन्शन करत एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये म्हटले आहे की, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एका नाण्याच्या दोन बाजू आहेत.
तुम्हाला प्रोटोकॉल समजला का ?. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलल्यामुळे उपमुख्यमंत्री बोलले नाहीत. तो आठवावा शपथविधी….!