“पिंपरी-चिंचवड महापालिकेने सुपरस्पेशालिटी कर्करोग रुग्णालय उभारावे”

आमदार अण्णा बनसोडे यांची मागणी

0

पिंपरी : बदलत्या जीवनशैलीमुळे कर्करोग असलेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावर पिंपरी-चिंचवड शहरात सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात उपचार मिळावेत, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, अशी मागणी पिंपरीचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांनी केली.  याबाबत बनसोडे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक, कामगार, श्रमिकांची नगरी आहे. या शहरात महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नागरिक वास्तव्यास आले आहे. शहरात सुमारे 30 ते 32 लाख लोकसंख्या आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे, याकरिता त्यांना सोई-सुविधा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यात जीवनशैलीतील बदलांमुळे नागरिकांना गंभीर आजारांची लागण होत आहे.


सामान्य माणसांना हे लवकर समजून येत नाहीत. ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. विशेषता कर्करोग या जीवघेण्या आजारावर वेळेवर  उपचार घेतले नाहीत  तर गंभीर परिणाम होऊ शकतात. म्हणून रुग्णास चांगले व वेळेत  उपचार मिळणे आवश्यक आहे म्हणून महानगरपालिकेने कॅन्सर रुग्णालय सुरू करावे, असे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले.

शहरातील गोरगरीब रुग्णांना कर्करोगावर या रुग्णालयात अल्पदरात उपचार मिळाले पाहिजेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळत नाहीत. त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना कर्करोगावर शासकीय दरात उपचार उपलब्ध व्हावेत, यासाठी महापालिकेच्या वतीने स्वतंत्र सुपरस्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेण्यात यावा असे बनसोडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

देशातील १ लाख लोकसंख्येमागे सुमारे ५० रुग्ण कर्करोगाने ग्रस्त आहेत. दरवर्षी कर्करोगाच्या रुग्णांची संख्या सुमारे ८ लाखाने वाढत आहे. त्यामुळे दरवर्षी सुमारे ५ लाख ५६ हजार रुग्णांचा मृत्यू कर्करोगाने होत असल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले आहे.


यामध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक असून, त्यात तोंड, अन्ननलिका, जठर, फुफ्फुस, प्रोस्टेट या अवयवांना होणारा कर्करोग आणि महिलांमध्ये स्तनाचा, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे.

तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेने कर्करोग रुग्णालयासाठी लागणारी जमीन, इमारत, आर्थिक तरतूद आणि अपुरे मनुष्यबळ या सर्व बाबी विचारात घेता, महापालिकेला कॅन्सर रुग्णालय उभारणे संयुक्तिक होणार नाही. तर त्यांनी पीपीपी किंवा बीओटी तत्त्वावर हे रुग्णालय उभारून नागरिकांना सेवा उपलब्ध करून दिल्यास त्यांचा गोरगरिबांना रुग्णांना फायदा होईल व अल्प दरात सेवा मिळेल, असेही आमदार बनसोडे यांनी म्हटले आहे.


एकूणच शहराला एका सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालयाची गरज असून YCM अर्थात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय ही गरज भागविण्यासाठी समर्थ नसून  पुढील काळात शहरातील आरोग्य सुविधांचे सक्षमीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.