मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांच्यावरील सर्व गुन्हे रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात तपास यंत्रणांकडून सुरू असलेल्या सर्व चौकशा आता संपल्या आहेत. मोहित कंबोज यांना सीबीआयने अखेर क्लीन चीट दिली आहे. या संदर्भातली माहिती समोर आल्यानंतर मोहित कंबोज यांनी ‘सत्यमेव जयते’ म्हणत समाधान व्यक्त केले आहे.
भाजप नेते मोहित कंबोज हे नेहमीच चर्चेत असतात. खासदार संजय राऊत यांच्यावर केलेले आरोप आणि त्यानंतर झालेले पलटवार यामुळे मोहित कंबोज यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच त्यांच्याकडे असलेली संपत्ती यामुळे देखील त्यांच्यावर अनेक आरोप झाले होते. शिवसेनेमध्ये झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या बंडा नंतर आमदारांना भेटण्यासाठी मोहित कंबोज हे सुरत येथे गेले होते. त्यामुळे देखील त्यांचे नाव चर्चेत आले होते. या आमदारांना गुहाटीमध्ये हलवण्यात देखील त्यांनीच मदत केली होती.
इंडियन ओव्हरसीज बँकेच्या व्यवस्थापनाने त्यांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच बँक ऑफ बडोदा ने देखील त्यांना कर्ज बुडवे घोषित करण्याची तयारी केली होती. याबरोबरच विविध प्रकरणात त्यांच्यावर मनी लॉन्ड्रींगचे आरोप करण्यात आले होते. अखेर त्यांना क्लीन चिट मिळाली आहे.
मोहित कॉम्बोजे मूळचे उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून 2004 मध्ये ते मुंबईत आले होते. 2005 मध्ये त्यांनी मुंबईत स्वतःचा ज्वेलरी व्यवसाय सुरू केला. केबीजे या नावाने त्यांचा ज्वेलरी व्यवसाय लवकरच भरभराटीला आला. या व्यवसायात त्यांनी चांगलाच जम बसवला. या व्यवसायातील यशामुळे 2012 ते 2019 पर्यंत ते इंडियन बुलियन आणि ज्वेलरी असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2014 च्या निवडणुकीत भाजप कडून त्यांनी दिंडोशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रकानुसार ते या निवडणुकीतील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते.