नवी दिल्ली : अतिवृष्टी व पूरपरिस्थिती, दरड कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यातील रस्त्यांचे सुमारे 1 हजार 800 कोटी रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाने वर्तविला आहे. त्यात, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक रस्ते वाहून गेले आहेत. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही माहिती दिली होती. त्यानंतर, आता नितीन गडकरींनी मोठी घोषणा केली आहे.
राज्याच्या सर्वच विभागांमध्ये अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सर्वाधिक सुमारे 700 कोटी रूपयांचे नुकसान एकट्या कोकण विभागात झाले असून, त्याखालोखाल पुणे विभाग, अमरावती विभाग, औरंगाबाद विभाग, नागपूर विभाग व नाशिक विभागाचा क्रम आहे, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले होते.
तसेच, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक नुकसान झालेल्या जिल्ह्यांमधील हानीची पाहणी करण्यासाठी जिल्हानिहाय मुख्य अभियंत्यांची व समकक्ष दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात केंद्रीय रस्ते व दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनाही त्यांनी कळवले होते. गडकरी यांनी या पूराची दखल घेत तात्काळ 100 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.
कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागात खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. तसेच, या कामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात 52 कोटी रुपये तात्पुरत्या डागडुजीसाठी आणि 48 कोटी रुपये कायमच्या दुरुस्त्या आणि बांधणीसाठी मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहितीही गडकरी यांनी ट्विटरवरुन दिली.