मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात विविध भागात कोरोनाबाधित एक दोन रुग्ण आढळून येत आहे. कोल्हापूरमध्ये नुकतेच दोन बाधित आढळले आहेत. त्यामुळे राज्याची आरोग्य यंत्रणा पुन्हा अलर्ट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य टास्क फोर्सने बंदिस्त ठिकाणी मास्क वापरण्याची सक्ती करावी अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याशिवाय लसीकरण वाढवण्याचेही सांगितले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची शक्यता आहे.
देशात कोरोना बाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. दिल्ली, कर्नाटक तसेच अन्य राज्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील टास्क फोर्सने चिंता व्यक्त केली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत टास्क फोर्सने बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण परिस्तिथी सांगितली. तसेच मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे टास्क फोर्सने म्हंटले आहे