कोरोना विषाणू व्यवस्थापन पथकाची स्थापना

0
पिंपरी : चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील कोरोना विषाणूचा प्रतिबंध करून वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याअंतर्गत कोरोना विषाणू व्यवस्थापन पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्मिता झगडे यांच्याकडे महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णालयातील ऑक्सिजन, खाटांची संख्या व उपलब्धता, कोरोना प्रतिबंधक लसीची उपलब्धता, कोरोना चाचणी संदर्भातील कामकाज, त्याबाबत घ्यावयाचे धोरणात्मक निर्णय, खासगी रुग्णालय, कंपन्यांशी संपर्क साधण्याची जबाबदारी असणार आहे.
दक्षता व गुणनियंत्रण विभागाचे कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांच्याकडे महापालिकेची रुग्णालये, ऑटो क्लस्टर, जम्बो कोविड सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड हॉस्पिटल, कोविड केअर सेंटरसाठी आवश्यक असणारी औषधे वेळेत उपलब्ध करून देण्यासंदर्भात भांडार विभागाशी समन्वय ठेवून पाठपुरावा करणे. महापालिकेच्या कोणत्याही विभागामार्फत कोविड संदर्भात येणारी बिले, वैद्यकीय व इतर आवश्यक सोयी सुविधा पुरविण्याकरिता खासगी पुरवठाधारकांची बिले वेळेवर अदा करण्याच्या कामकाजावर देखरेख ठेवणे. बिलाबाबत प्राप्त होणाऱ्या तक्रारींची वैधानिक तपासणी करून निराकरण करण्याची जबाबदारी पोरेड्डी यांच्यावर सोपविली आहे.
आकाश चिन्ह विभागाचे उपायुक्त मंगेश चितळे यांना विभागीय आयुक्त कार्यालयाशी कोरोना संदर्भात सोपविण्यात आलेल्या कामकाजाबाबत समन्वय राखणे. खासगी रुग्णालयांच्या बीला संदर्भात येणाऱ्या तक्रारींचे निराकरण करणे, रुग्णवाहिका व्यवस्थापन व उपलब्धता इत्यादी कामकाजाचे नियंत्रण व संचालन करणे, कोरोनाबाधित मृतदेहाची विल्हेवाट लावणे संबंधीचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडे सर्व क्षेत्रीय कार्यालयांशी कोरोना संदर्भातील कामकाजाच्या अनुषंगाने समन्वय साधने, क्षेत्रीय अधिकारी आणि रुग्णालय प्रमुखांसोबत जागेवर जाऊन कामाची पाहणी करणे, त्यांच्याशी समन्वय ठेवून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, कंटेनमेन्ट झोन बाबतचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. शगुन पिसे, वायसीएमएच मधील पदव्युत्तर संस्थेतील सहाय्यक प्राध्यापक अतुल देसले, महेश ठिकेकर, सहयोगी प्राध्यापक रितेश पाठक यांना अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना, आदेशाच्या अनुषंगाने इतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामकाज करावे लागणार आहे.
Leave A Reply

Your email address will not be published.