दसरा मेळावा : शिंदे गटाची उडी, कोणाला मिळणार परवानगी ?

0

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी मुंबई महानगर पालिकेत शिंदे गटाकडून अर्ज करण्यात आला आहे. शिवाजी पार्कवर हा मेळावा घ्यायचा आहे असे अर्जात नमूद आहे, शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी हा अर्ज केला. त्यामुळे आगामी काळात शिंदे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार असून कुणाला शिवाजी पार्कवर परवानगी मिळणार हे मात्र, अजून गुलदस्त्यात आहे.

शिवाजी पार्कवर दरवर्षी शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. यंदा मात्र, शिवसेनेतच फूट पडली. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, आता दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेकडून मुंबई महापालिकेत अर्ज दाखल करण्यात आला आहे, त्यावर अद्याप कुठलाही निर्णय झाला नाही, पण शिंदे गटाकडूनही शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगीसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठा पेच निर्माण होणार आहे.

सदा सरवणकर म्हणाले, मी कुठल्याही गटातटाचा नाही. मी शिवसेनेचा आमदार आहे, गत पंधरावर्षांपासून दसरा मेळाव्यासाठी परवानगी मिळावी म्हणून मी अर्ज करीत असतो. या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक एकनाथ शिंदे असतील. शिवसेना म्हणूनच मी अर्ज केला आहे, याचे संपूर्ण मार्गदर्शन एकनाथ शिंदे करणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे विचार दसरा मेळाव्यातून जाणे ही महत्वाची गोष्ट आहे. शिवसेनाप्रमूख म्हणून नाही पण प्रमूख नेते म्हणून मुख्यमंत्री शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे म्हणाल्या, हिंदुत्वाचा मुखवटा एकनाथ शिंदे यांच्या गटाने घातलेला आहे. त्यांच्याकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अर्ज करून त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला. पन्नास वर्षांची शिवसेनेची परंपरा आहे. शिंदे गट पोरकटपणा आणि थिल्लरपणा करीत आहेत. ते दिल्लीश्वरांच्या हातचे बाहूले आहेत. ठाकरेंना त्रास देण्यासाठीच हा प्रयत्न आहे. शिवसेनेचा पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आहे, शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, नकली कोण हे लोकांना कळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.