मुंबई : कोरोनामुळे नोकरी गमावलेल्या आणि व्यवसाय ठप्प झालेल्या लोकांवर सध्या मोठं आर्थिक संकट ओढावलं आहे. यापैकी अनेकांनी पैशांची आवक व्यवस्थित सुरु असताना बँकांकडून कर्ज घेतले होते. मात्र, आता रोजगारच हिरावला गेल्याने या लोकांना कर्जाचे हप्ते फेडणे मुश्किल झाले आहे.
अशा ग्राहकांसाठी पंजाब नॅशनल बँकेने एक खास ऑफर आणली आहे. लॉकडाऊनमुळे कर्जाचे हप्ते थकलेल्या या लोकांना पीएनबी बँकेने OTS अर्थात वन टाईम सेटलमेंटची ऑफर देऊ केली आहे. याचा अर्थ या ग्राहकांना विशिष्ट रक्कम भरून कर्जापासून मुक्ती मिळवता येईल. बँकेतील कर्जाच्या अनुत्पादक खात्यांसाठी (NPA) 75 टक्के सूट देण्यात आली आहे. एक लाखांहून अधिक रक्कमेच्या NPA अकाऊंटसवर 60 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. त्यामुळे कर्जदार 25 ते 40 टक्के रक्कम भरून कर्जाच्या जोखडातून कायमचे मुक्त होऊ शकतात.
काय आहे नेमकी योजना?
* 31 मार्च 2021 पर्यंत बँकेतून कर्ज घेतलेल्या लोकांनाच या योजनेचा लाभ मिळेल. पाच कोटी रुपयांपर्यंत कर्ज घेतलेल्या सर्वांना वन टाईम सेटलमेंट स्कीमचा लाभ उठवता येईल.
* यामध्ये 10 लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्याचाही समावेश आहे.
* या योजनेतंर्गत व्याज आणि मुदल रक्कमेचा काही भाग माफ करण्यात येईल.
* वन टाईम सेटलमेंटसाठी एक ठराविक रक्कम जमा करुन त्यानंतर तुम्ही उर्वरित पैसे हप्त्यांमध्येही फेडू शकता.
तुमच्या डोक्यावर एक लाख रुपयांचे कर्ज असेल तर तुम्हाला 25 ते 50 टक्के सूट मिळेल. एक लाखांपेक्षा जास्त रक्कमेच्या कर्जावर 25 ते 75 टक्क्यांची सूट मिळेल. तुमच्या कर्जाचा आऊटस्टँडिंग रक्कम 20 ते 50 लाख असेल तर त्यावर 40 ते 80 टक्के सूट मिळेल. तर 50 लाख ते 5 कोटीपर्यंतच्या कर्जावरील सूट सिक्युअर आणि अनसिक्युअर रक्कमेनुसार निश्चित केली जाईल.