पिंपरी-चिंचवडमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बॅडमिंटन अकॅडमीसाठी हालचाली!
महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन आणि आमदार महेश लांडगे यांची बैठक
पिंपरी : महाराष्ट्रातील पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकॅडमी पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे पदाधिकारी आणि भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. विशेष म्हणजे, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनानेही याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे.
पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील बॅडमिंटनपटूंसाठी हक्काचे व्यासपीठ तयार होणार आहे.
लोकप्रियतेच्या दृष्टीने भारतात सध्यस्थितीला बॅडमिंटन हा दुसऱ्या क्रमांकाचा खेळ आहे. बॅडमिंटनपटू सानिया नेहवाल, पी. व्ही. सिंधू, श्रीकांत, कश्यप यासारख्या युवा खेळाडूंनी जागतिक स्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षण केंद्राद्वारे विविध स्पर्धांमध्ये नवोदित खेळाडुंना संधी निर्माण करुन देण्याची आवश्यकता आहे. वास्तविक, सध्यस्थितीला देशभरात उपलब्ध असलेली प्रशिक्षण केंद्र आणि खेळाडुंची संख्या पहाता प्रशिक्षण सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. परिणामी, महाराष्ट्रातील अनेक गुणवंत खेळाडू हैद्राबाद, बंगळुरु, छत्तीगड आदी ठिकाणी प्रशिक्षण घेत आहेत. सध्यस्थितीला असलेल्या प्रशिक्षकांकडेही खेळाडुंची संख्या जास्त आहे.
अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील बॅडमिंटनपटूंना प्रोत्साहन पिंपरी-चिंचवड सारख्या विकसनशील शहरांमध्ये प्रशिक्षण सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. राज्य सरकार अर्बन लोकल बॉडीच्या माध्यमातून हैद्राबाद येथील पुलैला गोपिचंद अकॅडमीच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकॅडमी पिंपरी-चिंचवमध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये उभारण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखानी यांनी केली. यावर आमदार लांडगे यांनी महापालिका संबंधित विभागाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली असून, लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.
कशी असेल बॅडमिंटन अकॅडमी?
पिंपरी-चिंचवडमध्ये साकारणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची बॅडमिंटन अकॅडमी ६ एकर जागेत असेल. यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. अकॅडमीमध्ये १० कोर्ट असतील. निवासी प्रशिक्षण, जीम, स्वीमिंग पूल, रनिंग ट्रॅक आदी सुविधा याठिकाणी असतील. अकॅडमीच्या खर्चासाठी व्यावसायिक मदतही घेतली जाणार आहे. राष्ट्रीय क्रीडा केंद्राने यासाठी ‘साई’ची मदतही घेतली आहे. आर्थिकदृष्या दुर्बल असलेल्या पण गुणवंत खेळाडुंना संधी देवून या अकॅडमीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवण्यात येणार आहेत. तसेच, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन या अकॅडमीचे संचलन करण्यास तयार आहे. याबाबत बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाचीही मान्यता घेण्यात येणार आहे.
आमदार महेश लांडगे स्वत: खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाडुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत ते सकारात्मक भूमिका घेतील, अशी अपेक्षा होती. त्यानुसार आम्ही प्रस्ताव दिला. त्याला आमदार लांडगे यांनी प्रतिसाद दिला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने जागा आणि निधी उपलब्ध करुन दिल्यास देशातील आघाडीची बॅडमिंटन अकॅडमी उभारण्याचा आमचा संकल्प आहे. भविष्यात, पिंपरी-चिंचवडसह महाराष्ट्रातील खेळाडुंना या अकॅडमीचा फायदा होणार आहे. महापालिका प्रशासनाकडे कागदोपत्री पुर्तता झाल्यानंतर आम्ही प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करणार आहोत.
– अरुण लखानी,
अध्यक्ष, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन.