पिंपरी चिंचवड देशातील सर्वात वेगाने विकसीत होणारे शहर : अजित गव्हाणे
उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिर मोशी येथे संपन्न
पिंपरी : कोविड काळात सर्वच उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात आले होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य नियोजन करुन उद्योग, व्यवसायांना चालना मिळण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड मधील उद्योग नगरीसह राज्यातील उद्योग, व्यवसाय पुन्हा सक्षणपणे उभे राहत आहेत. राज्यभरात वाढलेली विजेची मागणी हे उद्योग, व्यवसाय वेगाने वाढत असल्याचे लक्षण आहे. माजी उपपंतप्रधान स्व. यशवंतराव चव्हाण, माजी खा. आण्णासाहेब मगर यांच्या दुरदृष्टीने स्थापन झालेली ही उद्योग नगरी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली देशातील सर्वात वेगाने विकसीत होणारे शहर म्हणून ओळखले जात आहे. याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना अभिमान आहे असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उद्योग व व्यापार विभागाच्या वतीने रविवारी (दि. १७) मोशी प्राधिकरण येथे आयोजित केलेल्या उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी अजित गव्हाणे बोलत होते. यावेळी माजी आमदार विलास लांडे पाटील, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी मदन शेळके, व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र घावटे, उद्योग व व्यापार विभागाचे राष्ट्रवादी शहराध्यक्ष कार्यक्रमाचे आयोजक विजयकुमार पिरंगुटे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, संजय वाबळे, विक्रांत लांडे तसेच संजय आहेर, विजय लोखंडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, मोनिका जाधव, मनिषा भोसले, श्रीकांत कदम, ॲड. सरवदे, महेश निपाणे, विजयकुमार हिंगे, ॲड. आर. सी. कुंभार, निलेश सोळंकी, अतुल गायकवाड, उद्योजक आण्णा घुले, भिवंडी शहराध्यक्ष इरफान शेख आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी मदन शेळके मार्गदर्शन करताना म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या बेरोजगार युवकांसाठी, व्यवसाय वृध्दीसाठी, अनेक कर्ज व अनुदान योजना आहेत. तसेच ‘क्लस्टर’ (समुहाने) योजने अंतर्गत नविन व्यवसाय व व्यवसाय वृध्दीसाठी देखील कर्ज व अनुदान योजना आहे. नविन उद्योग, व्यवसाय सुरु करणा-यांसाठी जीएसटी, वीज पुरवठा यामध्ये देखील शासनाच्या सवलत व अनुदान योजना आहेत. याचा बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा तसेच व्यवसायाची निवड करताना नागरीकांची गरज ओळखून ‘गरजेप्रमाणे वितरण’ हे सुत्र ओळखून व्यवसायाची निवड करावी.
व्यवस्थापन तज्ञ राजेंद्र घावटे मार्गदर्शन करताना म्हणाले की, जागतिकीकरणामुळे उद्योग, व्यवसायात होणारे बदल देखील व्यवसाय निवडीच्या वेळी विचारात घेतले पाहिजे. कोरोना काळात अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प झाले असताना ऑनलाईन व्यवसायांना व्यापक क्षेत्र निर्माण झाले. हा बदल तंत्रज्ञान आणि प्रशिक्षित मनुष्यबळामुळे अनेक उद्योजकांनी अल्पावधीतच आत्मसात केला. आता एकाच व्यक्तीवर केंद्रीत व्यवसाय करण्याऐवजी ‘टिमवर्क’ करुन व्यवसाय वाढतील व टिकतील. त्यासाठी दुरदृष्टी, नियोजन, व्यवस्थापन, मनुष्यबळ आणि शासनाची बदलणारी धोरणे याचा बारकाईने अभ्यास केल्यास उद्योग, व्यवसायात निश्चित यश येऊ शकते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या आदेशाने राज्यभर उद्योजकता विकास मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याची मुहर्तमेढ पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे यांनी पहिले शिबीर घेऊन केली आहे. आगामी काळात राज्यभर जिल्हा आणि तालुकास्तरांवर अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्वागत विजयकुमार पिरंगुटे, सुत्रसंचालन माधव पाटील आणि आभार अशोक मोरे यांनी मानले.