जम्मू : जम्मू-काश्मीरचे पोलिस महासंचालक (तुरुंग) हेमंत लोहिया यांच्या प्रकरणात आता दहशतवादी कनेक्शन समोर आले आहे. पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट नावाच्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
रात्री उशिरा ११.४५ च्या सुमारास हेमंत लोहिया यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेत त्यांचा नोकर यासिर अहमद याचे नाव समोर आले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो खून केल्यानंतर पळताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासिर हा गेल्या ६ महिन्यांपासून वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या घरी काम करत होता.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीपल्स अँटी फॅसिस्ट फ्रंट पाकिस्तानच्या जैश-ए-मोहम्मदशी संबंधित आहे. काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर या संघटनेचे नाव समोर आले. याआधीही या संघटनेने अनेकदा व्हीडीओ जारी करून धमक्या दिल्या आहेत. ऑक्टोबर २०२१ मध्ये पुंछ जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यातही या संघटनेचे नाव समोर आले होते. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले.
हेमंत लोहिया यांच्या घरी काही काम चालू होते, त्यामुळे ते जम्मूमध्ये त्यांचा मित्र राजीव खजुरिया यांच्या कुटुंबासोबत राहत होते. इथेच त्यांची हत्या करण्यात आली. अहवालानुसार, १९९२ बॅचचे आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांची दोन महिन्यांपूर्वी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. ते मूळचे आसामचे आहेत. हत्येनंतर फरार झालेल्या नोकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथकं तयार केली आहेत.
आयपीएस अधिकारी हेमंत लोहिया यांना दोन महिन्यांपूर्वीच जम्मू-काश्मीरच्या तुरुंग विभागाचे नवीन महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. ते शहराच्या बाहेर उदयवाला इथे राहत होते. हेमंत लोहिया यांच्या हत्येने पोलिस प्रशासनाची झोप उडाली आहे. कारण, ही हत्या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या जम्मू-काश्मीर दौ-यापूर्वी झाली आहे. त्यामुळेच सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अमित शहा तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौ-यावर आहेत.