पिंपरी : पिंपळेगुरव आणि नवी सांगवी भागातील अर्धवट आणि विविध प्रलंबित विकासकामांना गती द्यावी. स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेली काही कामेही अर्धवट स्थितीत असून ती पूर्ण करावीत, अशी मागणी भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी केली.
नगरसेवकांच्या कार्यकाळात पिंपळेगुरव आणि नवी सांगवीतील अनेक विकासकामांना सुरूवात करण्यात आली होती. परंतु, महापालिकेवर प्रशासक राज सुरू झाल्यानंतर या विकासकामांना थोडा ब्रेक लावण्यात आला आहे. बहुतांश कामे संथगतीने सुरू आहेत. त्यामुळे या भागातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. विकासकामांना गती मिळावी या उद्देशाने भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांनी स्थायी समितीचे माजी सभापती राजेंद्र राजापुरे, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, अंबरनाथ कांबळे यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून पिंपळेगुरव आणि नवी सांगवीतील सर्व कामांचा आढावा घेतला. अर्धवट स्थितीतील कामांबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
नवी सांगवीतील कृष्णा चौकाचे सुशोभिकरण, कृष्णा चौक ते एम. के. हॉटेलपर्यंत सांडपाणी वाहिन्यांचे काम, सांगवी फाटा ते सांगवी हा 12 मीटर रुंदीचा रस्ता पूर्ण करण्याची शंकर जगताप यांनी अधिकाऱ्यांकडे मागणी केली. तसेच पिंपळेगुरवमधील सुदर्शननगर चौकातील 8 टू 80 पार्कमधील खेळणी आणि व्यायामाचे साहित्य तुटल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे स्मार्ट सिटीअंतर्गत पिंपळेगुरवमध्ये सुरू असलेली काही कामे अर्धवट स्थितीत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी महापालिकेचे सहशहर अभियंता मनोज सेठिया, कार्यकारी अभियंता अनिल शिंदे, उपअभियंता विजय कांबळे, राहुल पाटील, चंद्रकांत मोरे आदी उपस्थित होते.