पुणे : नांदेडहून सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या कामगाराला ‘अॅन्टी करप्शन’चे अधिकारी असल्याची बतावणी करुन चौघा जणांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील ट्रॅव्हल थांब्याजवळ फुटपाथवर ७ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता घडली.
याबाबत मधुरम सत्यनारायण सोनी (२७, रा. गंगा सिटी, नांदेड) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी यांच्याकडील कर्मचारी शंकर भालेराव हे त्यांच्या सांगण्यावरुन सोने खरेदी करण्यासाठी नांदेडहून पुण्याला प्रवास करुन आले होते. ट्रॅव्हल बसमधून ते स्वारगेटला आले होते. यावेळी एका काळ्या रंगाच्या कारमधून चौघे जण आले.
त्यांच्यातील एकाने शंकर यांच्या खाद्यावर हात टाकून “अॅन्टी करप्शन” अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना पिस्टलसारख्या हत्याराचा धाक दाखवला. त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसविले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील १७ लाख ५८ हजार ७५० रुपयांची बॅग जबरदस्तीने चोरुन ते पळून गेले. ही बाब शंकर यांनी सोनी यांना कळविली. त्यानंतर त्यांनी पुण्यात येऊन फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक रसाळ तपास करीत आहेत.