मुंबई ः “पुरोगामी लोकशाही आघाडी म्हणजे यूपीए अधिक मजबूत होणे ही काळाची गरज आहे, पण ते व्हायचे कसे? विरोधकांच्या ऐक्यावर सध्या राष्ट्रीय मंथन सुरू झाले आहे. यूपीएचे नेतृत्व कोणी करावे, हा वादाचा मुद्दा नाही. यूपीए भक्कम करावी व भाजपासमोर आव्हान उभे करावे, हा मुद्दा आहे. काँग्रेस पक्ष हे सर्व घडवून आणण्यास समर्थ असेल तर त्यांचे स्वागत आहे”, असे मत शिवसेनेनं व्यक्त करत राज्यातील सत्तेत मित्रपक्ष असलेल्या काॅंग्रेससंदर्भात केलेले आहे.
युपीएच्या अध्यक्षपदावरून काॅंग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच जुंपलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी अगोदर मला यात युपीएचा अध्यक्ष होण्यात काही रस नाही आणि माझ्याकडे वेळही नाही, असे स्पष्ट सांगितलेले आहे. यावरून काॅंग्रेसला प्रत्युत्तर देत शिवसेनेनं असा सवाल उपस्थितीत केला आहे की, “आज काँग्रेसची हक्काची मतपेटी पूर्वीसारखी राहिलेली नाही. राज्याराज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही स्वतःचे एक स्थान निर्माण केले आहे. हैदराबाद महानगरपालिका निवडणुकांचे निकाल भाजपा विरोधकांचे डोळे उघडणारे आहेत. एकेकाळी ईशान्येकडील राज्यांतही काँग्रेस हा बलदंड पक्ष होता. आज चित्र बदलले आहे”, असेही शिवसेवेने म्हटलंले आहे.
“ख्रिश्चन, आदिवासी मतदारांचे प्राबल्य असूनही ईशान्येत भाजपाला मोठे यश मिळत आहे. अरुणाचल प्रदेशात काल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या. तेथील आकडेवारी धक्कादायक आहे. भाजपास १७१ तर काँग्रेसला ६ जागा मिळाल्या. इटानगरमध्ये प्रथमच निवडणूक लढविणाऱ्या जदयुला ९ जागा मिळाल्या. याचा अर्थ असा की, काँग्रेसचा परंपरागत मतदार इकडेतिकडे गेला आहे. यावर तोड काँग्रेसलाच काढावी लागेल. या विषयात इतरांनी पडू नये, असे काँग्रेस नेतृत्वास वाटते. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे व आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, असेदेखील त्यांचे नेते म्हणतात. आमचेही त्याबाबत वेगळे मत नाही. मोठ्या पक्षाच्या वाटचालीस आमच्या शुभेच्छा!”, असा खोचक टोलादेखील शिवसेनेनं काॅंग्रेसला लगावला आहे.
शिवसेनेनं पुढे म्हटलं आहे की, “काँग्रेस आजमितीस नक्कीच मोठा पक्ष आहे. पण मोठा म्हणजे नक्की काय आकारमानाचा? काँग्रेसच्या खालोखाल तृणमूल, अण्णा द्रमुक असे पक्ष संसदेत आहेत व हे सर्व भाजप विरोधक आहेत. देशातील विरोधी पक्षात पोकळी निर्माण झाली आहे व विखुरलेला विरोधी पक्ष एका झेंड्याखाली एकत्र यावा, अशी अपेक्षा ठेवली तर काँग्रेसमधील मित्रांना ठसका का लागावा? देशात भाजपाविरोधात असंतोषाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांना बदल हवाच आहे. त्याप्रमाणे पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. ते कोण देऊ शकेल हा प्रश्न आहे”, असे परखड मत शिवसनेने मांडले आहे.