मुंबई : आरएसएस अर्थातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय उडवून देऊ आणि मुंबईत बॉम्बस्फोट घडून असा इशारा देण्यात आल्याने खळबळ उडालीय.
मुंबई पोलिसांच्या कंट्रोलरुमला पुन्हा अज्ञात व्यक्तीने फोन करत नवीन वर्षात स्फोट घडविण्याची धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांकडून काल कॉल येताच एकाला अटक करण्यात आलेली आहे. यामुळे मुंबई पोलिस अलर्टवर असल्याचे दिसून येत आहे.
आझादनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दारुच्या नशेत या व्यक्तीने हा फोनकॉल केला असल्याचे समोर आले आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोलरुमला एका अज्ञाताने काल कॉल करत धमकी दिली होती. यानंतर मुंबई पोलिसांनी आझादनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला असून तपासाची चक्रे फिरवत एका संशयिताला अटक करण्यात आली, त्याने दारुच्या नशेत हा फोन कॉल केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. संशयितावर पोलिसांनी भादवि कलम 505 नुसार धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत रेल्वे पोलिसांना एक धमकीचा फोन आला आणि या फोनने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. एका निनावी फोन कॉलच्या माध्यमातू मुंबईत बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी देण्यात आली असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिस यंत्रणेची टीम बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत स्टेशन परिसरात दाखल झाली आणि त्यांच्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात आले होते.
मुंबईच्या वांद्रेमधील प्रसिद्ध अशा माऊंट मेरी चर्चवर दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. काल (गुरुवारी) ईमेलद्वारे लष्कर-ए-तोयबा या संघटनेच्यावतीने चर्चमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली असल्याची माहिती मिळते. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत भारतीय दंड संहितेच्या कलम 505 (3) नुसार अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.