औरंगाबाद : कोरोना नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी औरंगाबाद येथे दिली.
लॉकडाऊनमुळे शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुलामुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले. मुलांचे आणखी शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले. मागील दीड वर्षापासून कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु करणे शक्य नसल्याने ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली होती.
आता कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुधारीत शासन निर्णय जाहीर करण्यात आला. यानुसार १५ जुलैपासून शाळा सुरु होतील. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. १५ जुलैपासून कोरोनामुक्त गावातील शाळा सुरु झाल्यानंतर शहरी भागातील शाळाही सुरु करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा देखील सुरु करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
शहरी भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्यातील अनेक पालक तसेच स्थानिक आमदारांकडून विचारणा केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्यानंतर मागील वर्षी प्रमाणे टप्प्याटप्प्याने शहरी भागातील शाळा देखील सुरु करण्यात येतील. याबाबत शिक्षण विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. – वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री