मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन एक आठवडा झाला आहे. पण अजूनही इतर मंत्र्यांचा शपथविधी झालेला नाही. शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आषाढी एकादशी आधीच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. रविवारी आषाढी एकादशी असल्याने एकनाथ शिंदे पंढरपूरला शासकीय पुजेसाठी जाणार आहेत, त्याआधी म्हणजे शुक्रवारी किंवा शनिवारी नवे मंत्री शपथ घेतील.
पहिल्या टप्प्यामध्ये 8 ते 10 मंत्र्यांच्या शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. यामध्ये शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश असेल. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात सह्याद्री अतिथीगृहात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये शिंदे सरकारचा पहिला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
नव्या मंत्रिमंडळात ठाणे जिल्ह्याला जास्त मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्याला तब्बल 4 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री आणि दोन राज्यमंत्रीपदाचा समावेश आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात पालकमंत्रीपद भूषवणारे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. तर शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक आणि बालाजी किणीकर यांना राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय महामंडळात देखील ठाणे जिल्ह्यातील आमदारांची वर्णी लागणार असल्याची माहिती आहे.