पुणेः पुणे महापालिकेच्या एका उपायुक्तांसह त्यांच्या पत्नीवर सुमारे एक कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय भास्कर लांडगे (४९ वर्ष, उप आयुक्त (आकाशचिन्ह विभाग) वर्ग -१, पुणे महानगरपालिका) असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तर शुभेच्छा विजय लांडगे (४३) असे त्यांच्या पत्नीचे नाव आहे.
उपायुक्त विजय लांडगे व पत्नी शुभेच्छा लांडगे यांच्या नांवे सुमारे १ कोटी २ लाख ६० हजार ९९३ इतकी अपसंपदा धारण असल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झालेने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक संबंधित उपायुक्तांच्या घराची सकाळ पासून झाडाझडती घेत आहे.