मेडिकल इमर्जन्सीसाठी पीएफ खातेधारकांसाठी मिळणार १ लाख रुपये

0

नवी दिल्ली : जर तुमच्यावर एखादी वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती किंवा मेडिकल इमर्जन्सी आली असेल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. पीएफ खातेधारकांसाठी एका नवीन सुविधेला लागू करण्यात आले आहे. या सुविधेनुसार मेडिकल इमर्जन्सी असेल तर पीएफ खात्यातून म्हणजे प्रॉव्हिडंट फंडातून १ लाख रुपये काढता येऊ शकतात. कोरोनासारख्या महामारीला लक्षात घेऊन ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय पीएफ खातेधारकाला यासाठी वैद्यकीय खर्चाची सर्व माहिती देण्याची आवश्यकता नाही.

ही ईपीएफओमध्ये खाते असणाऱ्यांसाठीची सामाजिक सुरक्षा योजना आहे.

वैद्यकीय खर्चासाठी ईपीएफओचे सर्क्युलर

यासंदर्भातील सर्क्युलर १ जून २०२१ला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनेकडून म्हणजेच ईपीएफओकडून जाहीर करण्यात आले होते. याशिवाय यात म्हटले आहे की कोरोना महामारीसोबत इतर कोणत्याही घातक आजारामुळे अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यास १ लाख रुपयांची मदत घेतली जाऊ शकते, किवा १ लाख रुपये तात्काळ पीएफ खात्यातून काढता येऊ शकतात. याआधीदेखील वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी पैसे काढण्याची सुविधा ईपीएफओने उपलब्ध करून दिली होती. मात्र यासाठी पीएफ खातेधारकाला वैद्यकीय खर्चाचा अंदाज आणि माहिती देणे गरजेचे होते किंवा मेडिकल बिलाच्या रकमेएवढीच रक्कम काढता येत होती.

पीएफ खात्यातून १ लाख रुपये अॅडव्हान्स काढण्यासाठी काही सूचनांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत :-

मेडिकल अॅडव्हान्स तेव्हाच मिळू शकेल जेव्हा पेशंटला इलाजासाठी सरकारी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी किंवा सीजीएचएस पॅनल यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असेल. जर रुग्णाचा इलाज एखाद्या खासगी हॉस्पिटलमध्ये होत असेल तर अॅडव्हान्स रक्कम देण्याआधी ईपीएफओ अधिकाऱ्याकडून त्यासंदर्भातील पडताळणी केली जाईल.

कर्मचारी म्हणजे पीएफ खातेधारकाला किंवा त्याच्या कुटुंबाला उपचाराची माहिती द्यावी लागेल ज्यामध्ये इलाजासाठी पीएफ खात्याचा लाभ घेतला जातो आहे. रुग्णाची माहिती द्यावी लागेल मात्र वैद्यकीय खर्च किती येणार याचा अंदाज देण्याची आवश्यकता नाही. पीएफ खातेधारकाला मेडिकल अॅडव्हान्स दिला जाईल.

पीएफ खातेधारक किंवा त्याच्या कुटुंबातील एखादा सदस्य हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या वेळेस अर्ज केल्यानंतर १ तासाच्या आत ही रक्कम मिळू शकते.

पीएफ खात्यातून ऑनलाईन पैसे काढण्याची सुविधा

कोरोना महामारीच्या काळात अनेक सेवा हा डिजिटल किंवा ऑनलाईन स्वरुपात सुरू आहेत किंवा डिजिटल वापराला गती मिळाली आहे. आता EPF म्हणजे कर्मचारी भविष्य निधी फंडातून ऑनलाईन पद्धतीने पैसे काढणे सुलभ झाले आहे. कोरोना महमारीच्या काळात अनेक उद्योग धंदे ठप्प झाल्यामुळे तसेच अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्यामुळे दैनंदिन खर्च कसा भागवायचा हा प्रश्न अनेकांसमोर उभा राहिला आहे. त्यातच लॉकडाऊन किंवा कोरोनाच्या निर्बंधांमुळे कार्यालयांमध्ये जाणे शक्य होत नाही. अशावेळी ऑनलाईन सुविधेचा लाभ घेऊन कर्मचारी पीएफ खात्यातून ऑनलाईन स्वरुपात घरबसल्या पैसे काढू शकतात. यासाठी EPF खातेधारकाला EPFOच्या पोर्टलवर जावे लागेल. तिथे जाऊन आपल्या युएन नंबरद्वारे लॉगइन करणे आवश्यक आहे. पीएफ संबंधित कामासाठी https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जावे लागेल. याच वेबसाईटवररुन ऑनलाईन क्लेम सादर करता येतो.

Leave A Reply

Your email address will not be published.