आफ्रिकन देशातुन आलेले 10 विदेशी नागरीक बेपत्ता

0

नवी दिल्ली :  कोरोनाचा नवा अवतार असणाऱ्या ओमायक्रोनने देशात शिरकाव केला आहे. कर्नाटकात ओमायक्रोनचे दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. यातील एका रग्णाच्या संपर्कात आलेल्या डॉक्टरसह सहा जण पॉझिटिव्ह आढळल्याने टेन्शन वाढले आहे. याहून धक्कादायक म्हणजे ओमायक्रोनचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या आफ्रिकन देशांहून कर्नाटकमध्ये आलेले 10 विदेशी नागरीक बेपत्ता झाले आहेत.

हिंदुस्थानमध्ये ओमायक्रोनचा पहिला रुग्ण कर्नाटकमध्येच सापडला होता. दक्षिण आफ्रिकेहून आलेल्या दोघांना ओमायक्रोनची लागण झाली होती. आफ्रिकेहून आलेल्यांना ओमायक्रोनची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे बंगळुरु महापालिका अलर्ट झाली. मात्र येथूनच आलेल्या 10 विदेशी नागरिकांशी कोणताही संपर्क होत नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांचा घाम फुटला आहे.

बंगळुरु महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, सर्व बेपत्ता नागरीक विदेशातून हिंदुस्थानमध्ये आलेले आहेत. या नागरिकांची दक्षिण आफ्रिकन देशांमध्ये प्रवास केल्याची हिस्ट्री आहे. सर्वांचा फोनही बंद असल्याने त्यांचा पत्ता लावणे अवघड झाले आहे. परंतु आरोग्य विभागाचे अधिकारी त्यांचा शोध घेत असल्याचेही ते म्हणाले.

बंगळुरुत आले 57 प्रवासी

ओमायक्रोन व्हेरिएंट जगासमोर आल्यानंतर आतापर्यंत बंगळुरुमध्ये दक्षिण आफ्रिकन देशांमधून एकूण 57 प्रवासी आले आहेत. यातील बहुतांश नागरिकांची कोरोना चाचणी झाली आहे. यातील दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या सहा नागरिकांनाही कोरोनाची लागण झालेली आहे, परंतु त्यांना ओमायक्रोन झालाय का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही पॉझिटिव्ह

ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळलेला दुसरा व्यक्ती हा बंगळुरूच्या बोमनहळ्ळी येथील आरोग्य कर्मचारी आहे. त्यानेही कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले होते. त्याच्या संपर्कात आलेल्या 13 जणांची चाचणी केली गेली. त्यातील 3 जण पॉझिटिव्ह आढळले. त्यानंतर त्या 13 जणांच्या संपर्कात आलेल्या 205 जणांचीही चाचणी केली गेली. त्यापैकी 2 जणांचा अहवाला पॉझिटिव्ह आला अशी माहिती बंगळुरू महानगरपालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी दिली. या आरोग्य कर्मचाऱयाच्या संपर्कात आलेल्या एका डॉक्टरसह सहा जण पॉझिटिव्ह आढळल्याच्या वृत्ताला कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनीही दुजोरा दिला आहे. सर्वांची जिनोम सिक्वेन्सिंग चाचणीही केली जात आहे असे त्यांनी सांगितले.

घाबरू नका, काळजी घ्या! – आयसीएमआर

कर्नाटकात ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु काळजी घ्यावी लागेल. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच त्याबद्दल जनजागृतीही वाढवायला हवी, असे राष्ट्रीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले आहे.

बूस्टर डोस देणार नाही – निती आयोग

कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याचा सध्यातरी विचार नाही असे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे. आता पहिले प्राधान्य देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आहे. बूस्टर डोस कोणत्या लसीचा, कधी आणि कोणाला द्यावा यासंदर्भात अजूनही शास्त्रज्ञांची चर्चा सुरू आहे असे डॉ. पॉल यांनी सांगितले. आतापर्यंत 125 कोटी नागरिकांनी कोरोना लस घेतली आहे. त्यातील 79.13 कोटी नागरिकांनी पहिला डोस तर 45.82 कोटी नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.