भोसरी रुग्णालयात आयसीयूचे 10 बेड उपलब्ध होणार : रवी लांडगे

0

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये दररोज कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि उपलब्ध बेडच्या संख्येमध्ये खूप मोठी तफावत निर्माण होत आहे. विशेषतः गंभीर रुग्णांसाठी लागणाऱ्या आयसीयू बेडची कमतरता चिंता वाढवणारी आहे. अशा परिस्थितीत भाजपचे नगरसेवक रवि लांडगे हे महापालिकेच्या भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग (अतिदक्षता विभाग) सुरू करण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने अखेर भोसरी रुग्णालयात 10 बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. तसेच या विभागाच्या शेजारीच आणखी 10 बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

गेल्या वर्षी भोसरी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे आयसीयू आणि ऑक्सिजन बेडची सर्वात जास्त गरज असतानाही भोसरी रुग्णलयात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे भाजपचे नगरसेवक रवी लांडगे यांनी भोसरी रुग्णालयात जाऊन सर्व रुग्णालयाचाच आढावा घेतला.

या रुग्णालयात आयसीयू विभाग अत्यंत गरजेचा असल्याचे त्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरात कोरोनाने पुन्हा एकदा उग्र रुप धारण करण्यास सुरूवात केल्यामुळे भोसरी रुग्णालयात आयसीयू विभाग तातडीने सुरू करण्याची मागणीही त्यांनी आयुक्तांकडे केली होती.

प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे महापालिकेने भोसरी रुग्णालयात 10 बेडचा आयसीयू विभाग तयार केला आहे. त्याचे काम पूर्णत्वास येत आहे. तसेच आयसीयू विभागाच्या बाहेरच मोठी जागा असल्याने तेथे आणखी 10 बेड उपलब्ध केले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.