पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर महामार्गावर पाटस परिसरात रविवारी (दि.26) मध्यरात्रीच्या सुमारास 50 लाखांचा गांजा जप्त केला असल्याची माहिती यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे. याप्रकरणी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश येथील 7 पुरुष आणि 5 महिलांना अटक केली आहे. ही कारवाई मध्यरात्री एकच्या सुमारास करुन एक मालवाहतूक ट्रक ताब्यात घेतला आहे.
आरोपींनी हा गांजा पुणे जिल्ह्यातील काही दुकानात आणि मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आला होता, असा संशय पोलिसांना असून यामध्ये जिल्ह्यातील मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. पुणे आणि मुंबई येथे विक्रीसाठी ट्रकमधून गांजाच्या पिशव्या नेल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पाटस परिसरात सापळा रचून मिळालेल्या नंबर वरून ट्रक आडवला.
ट्रकची तपासणी केल्यावर ट्रकच्या केबिनमध्ये गांजाच्या पिशव्या आढळून आल्या. त्यामध्ये तीस लाख रुपये किंमतीचा पावणे दोनशे किलो गांजा होता. पोलिसांनी ट्रक आणि गांजा असा एकूण 50 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास यवत पोलीस करीत आहेत.