पिंपरी : महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत 40 निवासी सदनिकांसह बिगर निवासी अशा 153 मालमत्ता महापालिकेने सील केल्या आहेत. मालमत्ता सील करताच 58 मालमत्ता धारकांनी 3 कोटी 58 लाख 71 हजार 339 रूपयांचा कर भरला आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी थकीत कर भरून महापालिकेला सहकार्य करावे. तसेच जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी केले आहे.
शहरातील 50 हजारांपुढे थकबाकी असणाऱ्या 26 हजार 760, पाच लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या व्यावसायिक 1 हजार 361 तर मालमत्ता कराचा एकदाही भरणा न केलेल्या 3 हजार 850 अशा 31 हजार 971 मिळकत धारकांना जप्तीच्या नोटीसा कर आकारणी व कर संकलन विभागाचे सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी दिल्या आहेत. तसेच या मालमत्ता धारकांकडे तब्बल 631 कोटी रुपयांचा कर थकीत असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरात 5 लाख 79 हजार मिळकतींची नोंद आहे. चालू आर्थिक वर्षांत आत्तापर्यंत सुमारे 380 कोटी रूपये कराचा भरणा केला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षाचे कर आकारणी व कर संकलन विभागाने 1000 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी किमान 85 टक्के मालमत्तांचा टॅक्स वसूल करणे आवश्यक आहे. या एकूण परिस्थितीचा विचार केला तर उर्वरित साडेपाच महिन्यात जप्तीची मोहीम अधिक तीव्र होत जाणार हे निश्चित आहे. एकदा जप्ती केल्यानंतर वॉरंट फी, दंड अशी जवळजवळ पंधरा टक्के रक्कम मालमत्ता धारकांना अधिक भरावी लागते. त्यामुळे नागरिकांनी जप्तीची कारवाई होण्याअगोदर टॅक्स भरणे अधिक फायद्याचे आहे.
जप्तीच्या कारवाईचे पर्यवेक्षण स्वतः आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह करीत आहेत. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सर्व मंडल अधिकारी आणि प्रशासन अधिकारी यांची नुकतीच बैठक घेतली आहे. त्यांनी कर आकारणी व कर संकलन विभागाला जप्तीचे सर्व नियोजन आखून दिले आहे. या सर्व कारवाईवर आयुक्त सिंह बारीक लक्ष ठेऊन आहेत. यंदाचे उद्दिष्ट कुठल्याही स्थितीत पूर्ण करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे.
याबाबत माहिती देताना सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख म्हणाले, महापालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा मालमत्ता कर आहे. मात्र, शहरातील निवासी, व्यावसायिक अशा 31 हजार 971 मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी खीळ बसली आहे. शहरात जवळपास तीन लाखापेक्षा अधिक फ्लॅटधारक आहेत. आतापर्यंत फक्त पन्नास टक्के फ्लॅट धारकांनी टॅक्स भरला आहे हे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून येत आहे. त्यातही जवळपास 35 टक्के फ्लॅट धारक हे 31 मार्च 2022 रोजी असलेले थकबाकीदार आहेत. म्हणजे त्यांच्याकडे जवळपास दोन वर्षापेक्षा जास्तीची थकबाकी आहे. गतवर्षी केवळ पासष्ट टक्के मालमत्ता धारकांनी टॅक्स भरला होता. त्यावेळी एकूण 632 कोटीची वसुली झाली होती. यावर्षी 1000 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.
थकबाकी असणाऱ्या मालमत्ता धारकांची कर आकारणी व कर संकलन विभाग सातत्याने आकडेवारी काढत आहे. शहरातील ज्या भागात सर्वाधिक थकबाकीदार आहेत, अशा भागाची डाटा गोळा केला आहे. त्यानुसार 192 मालमत्तांची जप्तीची कार्यवाही करण्यात आली. त्यापैकी 153 मालमत्ता जप्त करून त्या सील करण्यात आल्या. मालमत्ता जप्त करताच 58 मालमत्ता धारकांनी त्वरीत 3 कोटी 58 लाख 71 हजार 339 रूपयांचा कराचा महापालिका तिजोरीत भरणा केला.
थकबाकी असणाऱ्या मालमत्ता जप्त केल्यानंतर अनेक मालमत्ता धारक त्वरीत कर भरत आहेत. मात्र, मालमत्ता जप्तीनंतरही काही जण कर भरत नसल्याचे समोर आले आहे. मालमत्ता जप्त केल्यानंतर 21 दिवसांच्या आत कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करण्यात येणार आहे, असा गंभीर इशारा सहाय्यक आयुक्त निलेश देशमुख यांनी दिला आहे.