मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील बंडखोर आमदारांवर कारवाईची प्रक्रिया सुरु झालेली आहे. त्यासंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटातील १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठवली आहे. मात्र, कायदेशीर आधारांवर ही नोटीस तग धरू शकणार नाही, आणि संबंधित आमदार अपात्र ठरू शकत नाही, असा दावा बंडखोरांच्या गटाकडून केला जात आहे.
त्यामुळे आता शिवसेनेकडून यासंदर्भातल्या कायदेशीर बाबी समोर ठेवण्यात आल्या आहेत. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना या प्रकरणी शिवसेनेची कायदेशीर बाजू सांभाळणारे वकील देवदत्त कामत यांच्याकरवी कायदेशीर पर्यायांविषयी माहिती दिली. यानुसार संबंधित १६ आमदार अपात्र ठरतील, असा विश्वास सावंत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतून बंडखोरी केलेले आमदार हे शिवसेनेच्या एकूण आमदारांच्या संख्येच्या दोन तृतियांश आहेत. त्यामुळे त्या हे आमदार अपात्र ठरू शकत नाहीत, असा दावा बंडखोरांच्या गटाकडून केला जात होता. त्यासंदर्भात आता शिवसेनेचे कामत यांनी सविस्तर माहिती दिली. जर एखाद्या सदस्याने स्वत:हून पक्षाचा राजीनामा दिला, तर तो अपात्र ठरू शकतो. सभागृहाच्या बाहेरची एखाद्या सदस्याची कृती पक्षविरोधी ठरली, तर त्या सदस्यावर अपात्रतेची कारवाई होऊ शकते, असे यावेळी कामत यांनी सांगितले.
शिवसेनेकडून अनेक बैठका बोलावण्यात आल्या होत्या. मात्र, या बैठकांना बंडखोर आमदार हजर राहिले नाही. शिवाय, दुसऱ्या राज्यात जाणे, भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणे, सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न करणे हे यासंदर्भातल्या कायद्याच्या परिच्छेद २अ चे उल्लंघन आहे, अशी माहिती कामत यांनी दिली.