मुंबई : महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर स्थानिक पातळीवरील निवडणुकीतसुद्धा तिन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु, भिवंडीमध्ये काँग्रेसला धक्का बसला आहे. काँग्रेसमधील १८ नगरसेवक हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये नगरसेवकांचा प्रवेश सोहळा पार पडला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. यावेळी दौंड येथील रासपच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला.
भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडीपासून काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू होता. याच वादातून आता काँग्रेसचे १८ नगरसेवक हे काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. भिवंडीतील काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे हे नगरसेवक काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत. या सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने नोटीस दिली होती. त्यानंतर आता या नगरसेवकांनी काँग्रेसलाच हात दाखवला आहे. शरद पवार यांनी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद होऊ नये म्हणून सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, त्यानंतर आता या सर्व नगरसेवकांनी एकाकी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.