मुंबई ः ”कोविड-१९ च्या काळात १ लाख १२ हजार कोटींची गुंतवणूक ही संपूर्ण देशासाठी महाराष्ट्राचे एक उत्तम उदाहरण आहे. उद्योग विभागाच्या वतीने मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत वर्षभरात थेट विदेशी गुंतवणूक आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून महाराष्ट्राने मागील वर्षभरात २ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित केली आहे”, असे मत उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात २५ भारतीय कंपन्यांसोबत ६१ हजार कोटी रुपयांचा सामजस्य करार केला. यातून २ लाख ५३ हजार ८८० रोजगार उपलब्ध होणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”या गुंतवणुकीत पिझ्झा, आइसक्रीम आहे. शेततळे आहे, दूध आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्राला तुमची ताकद मिळत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रात गुंतवणूक होत आहे. घरातून ताकद मिळाल्यानंतर हत्तीचे बळ मिळते. महाराष्ट्राच्या परिवारातील तुम्ही सर्व आहात. तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. देशाच्या प्रगतीची धारणा महत्त्वाची आहे. कष्ट करण्याची तयारी आपल्या अंगी असेल तर नक्कीच महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल. उद्योग मित्र ही संकल्पना उत्तम असून त्यामुळे उद्योजकांच्या अडचणी लवकर दूर होतील आणि कामाला गती मिळेल. उद्योजकांनी या संकटाच्या काळात देखील महाराष्ट्रात गुंतवणूक केली हे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या सोबत राहील”, असे मत त्यांनी मांडले.