पुणे : जमिनीच्या वादातून 2 कोटींच्या खंडणी, फसवणूक प्रकरणी उद्योजक नानासाहेब गायकवाड, गणेश गायकवाड आणि दीपक गवारे यांच्याविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (36), नानासाहेब शंकरराव गायकवाड आणि दिपक निवृत्ती गवारे ( रा. जेएम रोड, पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
25 वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. दाखल असलेल्या फिर्यादीनुसार, सन 2010 मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी यांच्या वडिलांशी बालेवाडी येथील 90 गुंठे जमिनीचा व्यवहार केला होता. 3 लाख रुपये गुंठा असा दर ठरला होता. त्यांनी केवळ 15 लाख रुपये दिले होते.
उर्वरित रक्कम दिली नाही. तेव्हापासून एप्रिल 2021 पर्यंत फिर्यादी हे नानासाहेब गायकवाड आणि गणेश गायकवाड यांच्या संपर्कात आहेत. गायकवाड पिता-पुत्रांनी फिर्यादी यांच्याकडे जमीन परत देण्यासाठी 2 कोटी रुपयांची खंडणी तर मागितलीच आणि परत जमीन मागितल्यास गोळ्या घालू अशी धमकी देखील दिली.