पुणे : गृह कर्ज देण्याच्या बहाण्याने हाउसिंग फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्याकडे बनावट दस्तावेज सादर करून तब्बल दोन कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एकूण आठ आरोपींवर चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
राजेश जैन ,कोमल जैन ,अमित जैन, पूनम जैन, अमित खान, कौसर खान, निजाम शेख (सर्व राहणार- हडपसर ,पुणे )या आरोपींवर पोलिसांनी गुन्हे दाखल केला आहे. याबाबत अर्चना वैभव आगाव (वय -42 ,राहणार -हडपसर ,पुणे) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार जुलै 2017 ते सन 2019 यादरम्यान घडला आहे. याप्रकरणी संबंधित तक्रारदार यांचा अर्ज चौकशी करून पोलिसांनी विलंबाने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित आठ आरोपींनी एकमेकाशी संगणमत करून गृह कर्ज घेण्याच्या बहाण्याने फायनान्स लिमिटेड कंपनी यांच्याकडे दुय्यम निबंधक, खेड पुणे यांच्या पुढील ऑफिस सील व स्टॅम्पचे खोटे व बनावट दस्तावेज सादर करून एकूण दोन कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आलेली आहे.याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एन गायकवाड करत आहे.
आरोपी शुभांगी सुधीर मते व सुधीर मारुती मते ( दोघे राहणार -जुनी सांगवी, पुणे )यांनी आपापसात संगणमत करून सांगवी परिसरातील उत्सव अपार्टमेंट या बिल्डिंगमध्ये दोन फ्लॅटवर आदित्य फायनानस यांचे गृह कर्ज घेतले होते. मात्र, त्यानंतर देखील त्यांनी सदरची मिळकत ही आयसीआयसीआय बँक यांच्याकडे गहाण ठेवून बँकेतून एक कोटी पंधरा लाख आठ हजार रुपयांचे बिल्डरचे बनावट डिमांड लेटर तयार करून घेत, बँकेची सदर रकमेची फसवणूक केली आहे. या प्रकरणी बँकेच्या वतीने निखिल दिनेश गुप्ता (41 ,राहणार- बाणेर ,पुणे )यांनी आरोपी विरोधात चतुर्शिंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.