20 हजाराची लाच : भूमी अभिलेख कार्यालयातील लिपिक अटकेत

0

इंदापूर : मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी 20 हजार रुपये लाच घेताना उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय इंदापूर येथील आवक जावक लिपिक राजाराम दत्तात्रय शिंदे (54) यांना लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. राजाराम शिंदे यांच्याविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे एसीबीने ही कारवाई मंगळवारी (दि.14) केली. याबाबत 41 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. पुणे एसीबीच्या अधिकाऱ्यांनी 10 जून रोजी पडताळणी करुन मंगळवारी सापळा रचून ही कारवाई केली.

तक्रारदार यांच्या चुलत्यांच्या नावाने इंदापूर तालुक्यातील निंबोडी येथे जमीन आहे. या जमिनीच्या क्षेत्राची दोन महिन्यापूर्वी मोजणी करण्यात आली आहे. मोजणी केलेल्या क्षेत्राची हद्द कायम करण्यासाठी शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागितली. तडजोडीअंती 20 हजार रुपये देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची 10 जून रोजी पडताळणी करण्यात आली. त्यावेळी लिपिक राजाराम शिंदे याने तक्रारदार यांच्याकडे 25 हजार रुपये लाच मागून त्यापैकी 20 हजार लाच घेण्याचे मान्य केले. त्यानुसार मंगळवारी भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची 20 हजार रुपये रक्कम स्विकारताना राजाराम शिंदे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे पथकाने केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप वऱ्हाडे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.