पिंपरी : आकुर्डी येथे रात्रीतच 20 ते 25 झाडे पुर्ण पूर्णपणे तोडण्यात आलेली आहेत.
याबाबत माहिती देताना, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सचिव अमित गोरखे म्हणाले की, “रात्री आकुर्डीमधील शंकर नगर व दत्तनगर भागामध्ये महानगरपालिकेच्या ठेकेदाराच्या माणसांनी येऊन 20 ते 25 मोठ्या झाडांची निर्घृणपणे मुळासकट तोड केली. त्यांनी सांगितले, की महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ही झाडे तोडली आहेत. हा झोपडपट्टीचा भाग असल्यामुळे याला कोणी वाली नाही असे दिसते.”
पुढेही गोरखे म्हणाले की, “या प्रभागातील माजी नगरसेविका अनुराधा गोफने या माझ्या आई आहेत. त्यांना तसेच इतर तीन नगरसेवकांना या वृक्ष तोडीबद्दल माहिती देण्यात आली नव्हती. “
गोरखे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह व उच्च पदस्थ अधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे, की संबधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करावे व ज्या अधिकाऱ्याने वृक्षतोडीचे आदेश दिलेत, त्या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी.
पिंपरी चिंचवडमध्ये वुड माफिया आहे आणि तो कुणालाही जुमानत नाही हे वारंवार आम्ही पर्यावरण क्षेत्रात कार्यरत लोकांनी सांगितले. त्याचाच हा आजचा अजून एक कटु अनुभव. आयुक्तांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन त्वरित कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व संस्था करीत आहोत. असे स्मार्ट सिटी एनजीओचे सदस्य धनंजय शेडबाळे यांनी म्हंटले आहे.