मुंबई ः सोमवार मध्यरात्रीपासून मुंबईत पाच विमाने येणार आहेत. या विमानांतून एक हजारांहून अधिक प्रवासी येण्याची शक्यता आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेने शहरातील विविध हॉटेल्समध्ये दोन हजार खोल्या सज्ज ठेवल्या आहेत.
ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या करोनाच्या प्रजातीमुळे विमानसेवा बंद करण्यात आली आहे. विमानाने आलेल्या प्रवाशांना सात दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. त्यामुळे १ हजार फाईव्ह स्टार आणि फोर स्टार हाॅटेल्समध्ये तर, १ हजार त्याखालील हाॅटेल्समध्ये खोल्या सज्ज करण्यात आल्या आहेत. राहाण्याचे शुल्क प्रवाशांनाच भरावे लागणार आहे, अशी माहिती पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे.
परदेशातून मुंबईत आलेल्या प्रत्येक प्रवाशाला मुंबईतच विलगीकरणात रहावे लागणार आहे. मुंबईबाहेर राहाणाऱ्या प्रवाशांना सात दिवस घरी जाण्याची परवानगी मिळणार नाही. इंग्लडहून आलेल्या प्रवाशांचे सात दिवस हॉटेलमध्ये विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यांची पाचव्या आणि सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी करुन घरी पाठविण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
संबंधित बातमी : राज्यात रात्रीची संचारबंदी!