लोणावळा : गेल्या काही आठवड्यांपासून लोणावळ्यात सुरु असलेला जोरदार पाऊस कमी होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. मंगळवारी देखील शहरात 24 तासात तब्बल 213 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास लोणावळा धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा टाटा कंपनी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती यांनी दिला आहे. लोणावळा शहरात आजपर्यंत 1735 मिमी. पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी आजपर्यंत 1306 मिमी. पाऊस झाला होता.यंदा जुन महिन्यात पावसाने ओढ दिल्याने पाऊस पडणार की नाही अशी चिंता वाटत होती. मात्र जुलैत सुरु झालेल्या पावसाने सर्व सरासरी भरुन काढली असून अवघ्या आठ दिवसांत मावळ तालुक्यातील सर्व धरणे निम्म्याने भरली आहेत.
गेल्या आठ दिवसांत म्हणजेच पाच जुलै ते 12 जुलै या कालावधीत शहरात तब्बल 1650 मिमी पाऊस झाला आहे.