पुणे : शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह अन्य काहींना अटक करण्यात आले. पुणे पोलिसांच्या छापेमारीत सुपे यांच्या घर आणि कार्यालयातून मोठं घबाड सापडलं. यानंतर आता शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा पुणे पोलिसांच्या एका पथकाकडून आरोपी जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख अश्विन कुमार याच्या बंगळुरु येथील घरातून तब्बल 24 किलो चांदी 2 किलो सोनं आणि काही हिरे जप्त करण्यात आले आहे.
नुकतंच जी ए सॉफ्टवेअर कंपनीच्या प्रीतिश देशमुख याला अटक करण्यात आलेय. यानंतर आता याचे धागेदोरे थेट बंगळुरु येथील अश्विन कुमारपर्यंत जाऊन पोहोचले होते. काही दिवसांपूर्वीच त्याला अटक करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांचे एक पथक काल (शुक्रवारी) त्याच्या बंगळुरु येथील घरी दाखल झाले होते. यावेळी पोलिस पथकांनी छापेमारी केली. तेव्हा हिरे, सोनं, चांदी असा लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तुकाराम सुपे यांच्याकडून काल (शुक्रवारी) 33 लाख रुपये जप्त केले आहेत. आतापर्यंत सुपेकडून पुणे पोलिसांनी सुमारे 3 कोटी 93 लाख रुपयांची रोकड आणि दागिने जप्त केले आहेत. तुकाराम सुपेने हे पैसे 2018 आणि 2019 च्या TET परीक्षेतील गैरव्यवहारातून जमा केले आहेत. तर पोलिसांच्या कारवाई सुरु झाल्यानंतर सुपेने हे पैसे त्याच्या विविध नातेवाईकांच्या घरी लपवले होते. मात्र कसून केलेल्या तपासात पैसै बाहेर आले.
दरम्यान, TET परीक्षा घोटाळा प्रकरणी सुपेकडून रोकड हस्तगत करण्याचे काम सुरूच आहे. आज (शनिवारी) सुपेच्या मित्राकडून 5 लाख रुपये हस्तगत करण्यात आले. मागील 24 तासात सुपेचे 62 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान, 2 पेपरफुटीचे प्रकरणाचा तपास सुरू होता. म्हाडा पेपरफुटीचा तपास सुरू असताना टीईटीमध्ये गोंधळ असल्याचे दिसून आले. याप्रकरणी रात्री गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे. यामध्ये तुकाराम सुपे आणि सावरीकरचा समावेश असल्याचं पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितलं होतं.