मुंबई : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. एमबीबीएस आणि बीडीएसच्या अभ्यासक्रमात २,४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. शिल्लक राहिलेल्या सर्व जागांवर विनाडोनेशन प्रवेश देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमासाठी देशात २२४ महाविद्यालयांत तब्बल २ हजार ४६३ जागा अद्यापही रिक्त आहेत. या जागांवर प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना आता निव्वळ शैक्षणिक शुल्क भरावे लागणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नुकतेच देशभरातील एमबीबीएस आणि बीडीएसच्या रिक्त जागांबाबत माहिती प्रसारित केली आहे.
महाराष्ट्रातील १९ महाविद्यालयांत बीडीएस आणि एमबीबीएसच्या ३३२ जागा अद्यापही रिक्त आहेत. यात एमबीबीएससाठी सांगली, मुंबई, कोल्हापूर, लोणी, कऱ्हाड, वर्धा, पुणे येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. रिक्त जागांमध्ये एमबीबीएसच्या एनआरआय कोट्यामधील जागांचा समावेश सर्वाधिक आहे. यातील काही जागा एआयआयएमएस व जेआयपीएमईआरसारख्या केंद्रीय संस्थांमध्येही आहेत.
वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून भारतात आठ वर्षे अभ्यास पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन पुन्हा लाखो रुपये खर्च करून दोन वर्षे अभ्यास करावा लागतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता यंदा परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी ईअर ड्रॉप घेऊन उत्तम गुण मिळवून परदेशात प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली आहे.