पिंपरी : गेल्या पाच वर्षांत भाजपने पिंपरी-चिंचवड महापालिकेत केलेल्या प्रचंड भ्रष्टाचारामुळे त्यांचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. त्यातील रोज एकजण राजीनामा देत असून त्यांचे २५ नगरसेवक राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये येण्यास उत्सुक आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीतून एकही नगरसेवक बाहेर पडणार नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता पक्षात भरती होईल हे विसरून जावे आणि आपल्या पक्षातून होत असलेली गळती रोखावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे मुख्य शहर प्रवक्ते व समन्वयक योगेश बहल यांनी भाजपचे पक्षनेते नामदेव ढाके यांना मंगळवारी (ता.२२) दिले.
पुढील आठ ते दहा दिवसांत अनेकजण भाजप सोडून राष्ट्रवादीत येणार असल्याचा दावा बहल यांनी करीत ढाकेंना आणखी डिवचले. येत्या निवडणुकीत पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता महापालिकेत येणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊन कोणीही राजकीय आत्महत्या करणार नाही. मात्र ‘खोट बोल पण रेटून बोल’ या प्रवृत्तीतून ढाके हे जनतेमध्ये गैरसमज पसरवित आहेत. त्यांच्या अशा खोटारड्या वक्तव्याला आता शहरातील जनता बळी पडणार नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा आपल्या पक्षातील गळती रोखावी आणि त्यानंतरच भरतीची दिवास्वप्ने पहावीत, असे बहल म्हणाले.
भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी नुकताच पक्ष सदस्यत्व व नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावर प्रतिक्रीया देताना ढाके यांनी राष्ट्रवादीचे दहा नगरसेवक भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर बहल यांनी पलटवार करत ढाकेंना टोला लगावला. भाजपने गेल्या पाच वर्षांत आपल्या सत्ताकाळात अनेक गैरप्रकार केले.
कोरोनासारख्या महामारीचा गैरफायदा घेत ‘मृतांच्या टाळूवरील लोणी’ खाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाची खरी प्रतिमा जनतेसमोर आली आहे. लाचखोरी, खंडणी, जमीनी बळकाविणे, भ्रष्टाचार करणे असे एक ना अनेक प्रकार आपल्या सत्तेच्या काळात भाजपच्या नगरसेवक व पदाधिकार्यांनी केल्यामुळे महापालिकेचीही पुरती बदनामी झाली आहे, असे बहल म्हणाले. दरम्यान, बोराटेंनंतर भाजपच्या चंदा लोखंडे या दुसऱ्या नगरसेवकाने सोमवारी राजीनामा दिला. त्या ही येत्या शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.