राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार, गावं जलस्वयंपूर्ण करणार : देवेंद्र फडणवीस

0

पुणे : रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खराब झाला असून ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका लक्षात घेता राज्यात 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणणार असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात 2025 पर्यंत 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येणार आहे. पुण्यात ‘नैसर्गिक शेती’ राज्यस्तरीय परिषद 2022 चे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे देखील उपस्थित होते.

2016-17 मध्ये नैसर्गिक शेतीचे अभियान सुरु केल्यानंतर 9.5 लाख हेक्टर शेती नैसर्गिक पद्धतीने होत आहे. दुसऱ्या टप्प्यात हे क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी आणि फलोत्पादन विभागानं आखलेल्या कार्यक्रमाला आवश्यक निधी देण्यात येईल. यामुळं शेतकरी सुजलाम-सुफलाम होईल असेही फडणवीस यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीसाठी 2015-16 मध्ये केंद्र स्तरावर मिशन सुरू केले. महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात 2016-17 मध्ये सुरू केलेले डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे गट तयार झाले. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांना एकत्र करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि त्यांना सेंद्रीय शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास नव्याने मुदतवाढ देण्यात येईल. यात अजून काही जिल्हे समाविष्ट करण्यात येतील आणि नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल असेही फडणवीस म्हणाले.

राज्यात मागील काळात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून रब्बीचे पीक वाढवण्याचा प्रयत्न केला. या योजनेमुळं 39 लाख हेक्टर जमीन रब्बी पिकाखाली आली. तसेच 27 टीएमसी पाणी थांबवू शकलो आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचा फायदा झाला. हे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरुपात ही योजना आणली जाईल. पुढच्या टप्प्यात गावंजलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. त्या पाण्याचा योग्य उपयोग गावात व्हावा आणि नैसर्गिक शेतीला चालना मिळावी हे ध्येय ठेवून ही योजना राबवायची असल्याचे फडणवीस म्हणाले.

मागील काळात नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू केली. विविध गावांमध्ये केंद्रीत पद्धतीने राबवण्यास सुरुवात केले. जागतिक बँकेने साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी यासाठी दिला. या मिशनला गती देण्याचे काम शासन करणार आहे. स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला ‘स्मार्ट’ प्रकल्प महाराष्ट्रातल्या 10 हजार गावांमध्ये सुरु करण्यात आला. या प्रकल्पावर 2 हजार 100 कोटी खर्च करून व त्यांच्या माध्यमातून बाजारपेठेची श्रृंखला तयार करून शेतकऱ्याला योग्य भाव देण्यासाठी राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून साठवणूक व्यवस्था, विविध श्रृंखला तयार करणे, मार्गदर्शन, बाजाराशी लिंकेज याद्वारे शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करून त्यांना निधी उपलब्ध करून देण्याचे काम करण्यात येत आहे. या प्रकल्पालाही गती देण्यात येत असल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

नैसर्गिक शेती हा शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विषय आहे. 1905 मध्ये इंग्रज सरकारने अल्बर्ट हॉवर्ड यांना कृषी सल्लागार म्हणून पाठवले. त्यांनी पारंपरिक शेती विज्ञानाधारीत असून त्यात चक्रीय अर्थव्यवस्था आहे असल्याचे फडणवीस म्हणाले. आपण नंतरच्या काळात अन्नधान्याच्या संदर्भात स्वयंपूर्ण करण्यासाठी उपयोगात आणलेल्या रासायनिक खतांमुळे उत्पादन वाढले, पण चक्रीय अर्थव्यवस्था मंदावली. निविष्ठा, त्यासाठी खरेदी आणि बाजारावर अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळं शेतमालाचा भाव वाढताना उत्पादन खर्चही वाढत आहे. त्यामुळं शेती फायद्याची होत नसल्याचे फडणवीस म्हणाले.

नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, गोधन वाचेल, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, देश आत्मनिर्भर बनून शेतकऱ्यालादेखील लाभ होईल. त्यामुळं देशात नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करुन प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत त्याबाबतची माहिती पोहोचवावी, असे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.