क्रिप्टोब्रिझ कंपनीच्या नावाखाली तीन कोटींची फसवणूक

0

पुणे : बी.कॉम सायबर लॉचे प्रशिक्षण घेतलेल्या एका तरुणाने तंत्रज्ञानाचा वापर करून क्रिप्टोब्रिझ ही कंपनी स्थापन केली. क्रिप्टोब्रिझ एक्स्चेंजच्या माध्यमातून यूट्यूबवर ऑनलाइन प्रसिद्धी करत, देशभरात अनेक गुंतवणूकदारांची आकर्षित करत त्यांने ४४ जणांना २ कोटी ९३ लाखांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी संबंधित आरोपीस पळून जाण्याच्या तयारीत असताना जेरबंद केले.

राहुल विजय राठोड (३५, रा.हिंजवडी, पुणे, मूळ. रा. गुजरात) आणि त्याचा साथीदार ओमकार दिनकर सोनवणे (२५, रा.कोंढवा, पुणे) अशी याप्रकरणी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रविशंकर पाटील (३२, रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माहितीनुसार, राहुल राठोडने २०१९ मध्ये क्रिप्टोब्रिझ या कंपनीची स्थापना केली. गुंतवणूकदारांना एक्स्चेंजच्या माध्यमातून अल्पावधीत अधिक परतावा देण्याचे त्यांनी आमिष दाखवले. त्यासाठी ठराविक दिवसात ठराविक टक्के परतावा मिळेल, असे सांगितले.

माहितीनुसार, राहुल राठोड याने प्रतिदिन १, १.५, २ टक्के अशा प्रकारचा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले गेले. ट्रेडर्स डेस्टिनेशन या नावाने युट्युबवर त्याने ऑनलाईन व्हिडिओ करत अनेकांना भुरळ घालून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. गुंतवणूकदारांना सुरुवातीच्या काळात त्यांनी काही टक्केवारीने रक्कमा दिल्या. त्यामुळे लोकांचा विश्वासाने क्रिप्टोब्रिझमध्ये मोठी गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर गुंतवणूकदारांना परतावा देणे बंद करत, कोंढव्यातील आपले कार्यालय ही बंद केले.

याप्रकरणी २ कोटी ९३ लाख ६६ हजार रुपये फसवणूक झालेल्या कोलकत्ता, बंगळुरू, दिल्ली, चेन्नई, मुंबई, पुणे आदी शहरातील गुंतवणूकदारांनी एकत्रित येत पोलिस आणि न्यायालयाकडे तक्रार दाखल केली. सदर गुन्ह्याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.