पुंछ मध्ये 3 दहशतवादी अटकेत; Ak-47 सह 10 किलो IED जप्त

0

जम्मू काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील करमारहा सेक्टरमध्ये एलओसीजवळ भारतीय लष्कराने तीन दहशतवाद्यांना पकडले. हे तिघे 30 मेच्या रात्री खराब हवामान आणि पावसाचा फायदा घेत भारतीय सीमेत घुसखोरीचा प्रयत्न करत होते. कुंपण ओलांडून जाणाऱ्या तीन दहशतवाद्यांवर लष्कराच्या जवानांनी गोळीबार केला.

लष्कराने त्यांच्याकडून 10 किलो IED, AK-47 आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि ड्रग्ज जप्त केले आहेत. गोळीबारात जखमी झालेल्या एका दहशतवाद्यावर पुंछ येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पुंछमधील गुलपूर भागात नियंत्रण रेषेजवळ लष्कराने संशयास्पद हालचाली पाहिल्या. यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. लष्कराची कारवाई पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक घुसखोर जखमी झाला.

मोहम्मद फारुख (26), मोहम्मद रियाझ (23) आणि मोहम्मद जुबेर (22) अशी घुसखोरांची नावे आहेत. सर्व करमारहा येथील रहिवासी आहेत. फारुखच्या पायात गोळी लागली आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार या तिघांना सीमेपलीकडून शस्त्रास्त्र आणि ड्रग्जची खेप मिळाली होती. सैनिकांनी त्यांना अडवले तेव्हा ते तस्करीचा प्रयत्न करत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.