- पुणे : पुणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीच्या प्रारूप प्रभाग रचनेवर अखेरच्या दिवसापर्यंत तब्बल २ हजार ८०४ अर्जांतून ३ हजार ५९६ नागरिकांनी हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. या हरकती आणि सूचनांवर २४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असून यशदाचे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणुन नियुक्ती केली आहे. वानवडी- रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाकडे सर्वाधीक तर शिवाजीनगर – घोलेरोडला सर्वात कमी हरकती नोंदवल्या गेल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या २०२२ मध्ये होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १ फेब्रुवारी रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत १७३ जागांसाठी प्रभाग पद्धतीने निवडणुक होणार आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार त्रिसदस्यीय पद्धतीने निवडणुक होणार असून ५७ त्रिसदस्यीय व एक द्विसदस्यीय प्रभाग असणार आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेमध्ये अगदी सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला आहे.
आपल्याला अनुरूप प्रभागासाठी प्रशासकीय यंत्रणेवर राजकिय दबाव टाकण्यात आल्याचे आरोप झाले. यानंतरही ६ डिसेंबरला महापालिकेने राज्य निवडणुक आयोगाला सादर केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेमध्ये निवडणुक आयोगाने त्यांच्या स्तरावर बदल सुचविले व प्रत्यक्षात केले देखिल आहेत.
यानंतरही हरकती आणि सूचनांसाठी देण्यात आलेल्या कालावधीत ३ हजार ५९६ नागरिकांनी २ हजार ८०४ हरकती व सूचना नोंदविल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमारेषा असलेले ओढे, नाले, नदी, डोंगर तसेच मोठ्या रस्त्यांचा विचार करण्यात आलेला नाही. काही ठिकाणी मोठ्या सोसायटयांमधील काही इमारती एका प्रभागात तर काही इमारत दुसर्या प्रभागाला जोडण्यात आल्या आहेत.
प्रभाग रचना करताना प्रामुख्याने राज्यातील विरोधकांनी त्यांच्या पुर्वीच्या प्रभागांची अगदी चार ते पाच प्रभागांमध्ये तोडफोड करून भौगोलिकदृष्टया चुकीची रचना केल्याचे आरोप केले आहेत.
सर्वाधीक हरकती व सूचना वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयाकडे (१०३४) आल्या आहेत. तर सर्वात कमी हरकती शिवाजीनगर – घोलेरोड क्षेत्रिय कार्यालयाकडे (१२) आल्या आहेत. निवडणुक कार्यालयाकडेही १ हजार २९५ हरकती व सूचना गोळा झाल्या असून त्या संबधित क्षेत्रिय कार्यालयांकडे वर्ग करण्यात येतील.
वानवडी- रामटेकडी क्षेत्रिय कार्यालयापाठोपाठ धनकवडी- सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाकडे २८९ हरकती आल्या असून यापैकी २४६ हरकती या आज शेवटच्या दिवशी दाखल झाल्या आहेत.
कसबा- विश्रामबाग (२५३)
औंध-बाणेर ( ३५)
भवानी पेठ (२३)
बिबवेवाडी (६८ )
ढोले पाटील रोड (११३)
हडपसर – मुंढवा (८८)
कोंढवा – येवलेवाडी (५१)
कोथरूड- बावधन (७७)
नगररोड- वडगावशेरी (१५६)
सिंहगड रोड (२५)
वारजे – कर्वेनगर (६२)
येरवडा- कळस- धानोरी (१५)
क्षेत्रिय कार्यालयाकडे हरकती व सूचना आल्या आहेत. ३ हजार ५९६ हरकतींपैकी शेवटच्या दिवशीच तब्बल २ हजार ८०४ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.