भाजपचे 30 नगरसेवक स्थानिक नेतृत्वावर नाराज : तुषार कामठे

'ना खाऊंगा, ना खाने दुगा' याचा उलटच सर्व सुरु

0

पिंपरी : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, सिक्युअर आयटी सोलुशन कंपनीचा जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला, शहरातील अनधिकृत फ्लेक्स, मनपामध्ये जुन्या ठेकेदारांचे भाजपच्या पदाधिका-यांबरोबर संगनमत या विरोधात मी वेळोवेळी महानगरपालिके सभागृहात आणि वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. याबाबत पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती आणि मला वेळोवेळी डावलण्याचे त्यांचे धोरण होते. त्याच्या निषेधार्थ मी गुरुवारी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे असे प्रतिपादन नगरसेवक तुषार कामठे यांनी केले.

शुक्रवारी (दि. २५ फेब्रुवारी) पिंपरीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत तुषार कामठे यांनी भाजपाच्या स्थानिक नेतृत्वावर आणि मनपातील भ्रष्टाचारी अधिका-यांवर टिका केली. यावेळी ते म्हणाले की, महानगरपालिकेच्या तिजोरीची लुट करण्याचे स्थानिक भाजपा आमदार आणि पदाधिका-यांचे धोरण सामाजिक जाणिवेचे संस्कार घेऊन मी समाजकारणात आलो आणि पहिल्याच निवडणुकीत मायबाप जनतेने मला नगरसेवक पदावर काम करण्याची संधी दिली. जनतेच्या डोळ्यात आशा होती, बदल घडण्याची तीच आशा माझी प्रेरणा झाली, आणि मी अथकपणे कामाला सुरुवात केली, मी भारतीय जनता पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेचा पाईक आहे. केंद्रातील तसेच राज्यातील विविध नेत्यांचे विचार मला विकासाभिमुख वाटतात. म्हणूनच पाच वर्षात जे काही करायचं ते जनतेसाठी, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला त्या लोकांसाठी हे मनाशी ठाम ठरवून मी शिकत गेलो, कामे करत गेलो, पण पक्षातील स्थानिक नेत्यांची व वरिष्ठांची पहिल्यापासूनच अनास्था दिसून येत होती, तरीही त्याकडे मी दुर्लक्ष करून सर्वांचा सन्मान करत होतो, सतत जमिनीवर राहून लोकांमध्ये काम करण्याचेच संस्कार असल्यामुळे लोकांच्या प्रश्नांची व वेदनांची जाणीव मला होतीच. त्यातूनच पिण्याच्या पाण्याचा मूलभूत प्रश्न हाती घेऊन मी आवाज उठवला आंदोलन केले, उपोषणही केले आणि विश्वास बसणार नाही असा जनसमुदाय माझ्यासोबत उभा राहिला, कचऱ्याच्या समस्यासाठीचे आंदोलन असेल, दारूचे दुकान बंद करण्यासाठीचे आंदोलन, अनधिकृत फ्लेक्सच्या विरोधात आंदोलनात तर माझ्यावरच गुन्हा दाखल केला.

जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांविरुद्ध वेळोवेळी आवाज उठवणे असो, जे काही शक्य होत ते सर्व मी गेली पाच वर्षे करत होतो, पण जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी माझ्या भाजप पक्षाचे शहरातील नेते, पदाधिकारी किंवा आमदार यांचे कधीच सहकार्य लाभले नाही, उलट माझी ठिकठिकाणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या अडवणूकच करण्यात आली ही वेदना अनेक दिवसांपासून मनात सलत होती. पण तरीही मी जनसेवेचा वसा सोडला नाही, आणि सोडणारही नाही. नुकताच जनतेच्या ५५ कोटी रुपयांवर डल्ला मारणाऱ्या सिक्युअर आयटी सोलुशन या ठेकेदाराबद्दल मी पुराव्यांसाहित आवाज उठवला, पण शहरातील भाजप नेत्यांनी या विषयातही मला सहकार्य केले नाही.

नाईलाजाने ह्या भ्रष्टाचाराबद्दल मी राज्याचे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे कारवाईची मागणी केली असता त्यांनी तात्काळ ह्या विषयात कारवाईचे आदेश दिले, वेळप्रसंगी माझ्या पक्षातील नेत्यावर जरी गुन्हा दाखल झाला तरी बेहत्तर परंतु माझ्या पिंपरी चिंचवडकर जनतेला मी कधीच धोका देऊ शकत नाही आणि भ्रष्टाचार कधीच खपवून घेऊ शकत नाही असे अजित पवार यांनी सांगितले आणि त्यानंतरच संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल झाला. त्यावेळी खऱ्या अर्थाने मी शहरातील नेत्यांमध्ये शोधत असलेली राजकीय प्रगल्भता आणि धडाडी मला अजित पवार यांच्यामध्ये दिसली. काहीही झाले तरी जनतेवर अन्याय होऊ द्यायचा नाही या भूमिकेतून त्यांनी मी दुसऱ्या पक्षाचा नगरसेवक असूनही तात्काळ माझ्या रास्त मागणीची दखल घेतली आणि मला सर्वोतोपरी मदत केली.

भारतीय जनता पक्षाचा मूळ सर्वसमावेशक विचार मला त्यावेळी त्यांच्यामध्ये दिसला आणि अनेक दिवसांपासून माझ्या मनात सलत असलेल्या वेदनेला फुंकर मिळाली, अशा प्रगल्भ नेत्यांचे सहकार्य मिळाले तर भविष्यात जनतेच्या आयुष्यात नक्कीच  आमूलाग्र बदल घडविण्याची ताकद आपल्याला मिळेल हे लक्षात घेऊन पूर्ण विचाराअंती मी तुषार गजानन कामठे अधिकृतरित्या माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. पण जनतेशी माझी असलेली बांधिलकी आजन्म कायम राहिल यात तिळमात्रही शंका नाही. मायबाप जनतेने आजवर माझ्यावर जे प्रेम केलं, विश्वास दाखविला तोच विश्वास पुढच्या काळातही मला नक्कीच मिळेल असा विश्वास नगरसेवक तुषार कामठे यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.