सराईत चोरट्यांकडून 17 तोळे सोन्यासह 30 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

पिंपरी : दरोड्याचा तयारीत असलेल्या टोळीला अटक करुन त्यांच्याकडून चार कार, चार दुचाकी, 17 तोळे सोने, एक किलो चांदी, तीन टीव्ही, रोकड आणि घरफोडीचे साहित्य, असा एकूण 30 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी हस्तगत केला आहे.

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (32), जितसिंग राजपालसिंग टाक (26, रा. बिराजदारनगर, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक मंगेश भांगे यांना गस्त घालत असताना माहिती मिळाली की, इंद्रायणीनगर, भोसरी परिसरात हडपसर येथील सराईत गुन्हेगारांची एक टोळी कारमधून येणार आहे.

त्यानुसार, दरोडा विरोधी पथकाने तीन टीम तयार करून सापळा लावला. एक संशयित अल्टो कार दिसताच पोलिसांनी कारवाईसाठी हालचाल सुरु केली. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागले. दरम्यान तिघेजण कारमधून अंधाराचा फायदा घेऊन झाडाझुडूपातून पळून गेले. तर दोघेजण पोलिसांच्या हाती लागले. दोघांना ताब्यात घेऊन कारची झडती घेतली असता कारमध्ये दोन बोअर कटर, दोन लोखंडी स्क्रू ड्रायव्हर, दोन लोखंडी कोयते, दोन लोखंडी कटावणी, एक सुटी दोरी, एक कार असा मुद्देमाल जप्त केला. इंद्रायणीनगर, भोसरी मधील वैष्णोमाता कॉलनी येथे दरोडा टाकण्यासाठी हडपसर येथून आल्याची आरोपींनी कबुली दिली.

आरोपींनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर, पुणे ग्रामीण परिसरातून बंद घरांचे, दुकानांचे कुलूप कटावणीने तोडून घोरफोडी तसेच वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी एक तवेरा कार, दोन मारुती अल्टो कार, एक स्विफ्ट डिझायर कार, एक मारुती झेन कार, एक होंडा स्प्लेंडर, एक बजाज पल्सर, एक बजाज डिस्कव्हर, एक होंडा ऍक्टिव्हा मोपेड अशी एकूण नऊ वाहने हस्तगत केली आहेत. तसेच 170 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, एक किलो चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही आणि घरफोडीचे साहित्य असा एकूण 30 लाख 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.