300 कोटींचे बिट कॉइन व लाखो रुपयांसाठी अपहरण

'मास्टर माईंड' पोलीस कर्मचाऱ्यासह आठ जणांना अटक

0

पिंपरी : सायबर शाखेत काम करत असताना एकाकडे 300 कोटी रुपयांचे बिट कॉइन (क्रिपटो करन्सी) असल्याचा समज करुन पोलीस कर्मचाऱ्याने प्लॅन बनवला. बनवलेल्या प्लँन नुसार एकाचे अपहरण करुन, त्याला कोकणात नेले. मात्र पोलीस मागावर असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. वाकड पोलिसांनी तपास करुन पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील मुख्यालयात असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांना अटक केली आहे.

विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) असे अपहरण आणि सुटका झालेल्याचे नाव आहे. तर मास्टर माईंड पोलीस कर्मचारी
दिलीप तुकाराम खंदारे, सुनिल राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस डिसूझा, मयूर महेंद्र शिर्के, प्रदीप काशीनाथ काटे, शिरीष खोत, संजय उर्फ निकी रमेश बन्सल या आठ जणांना अटक केली आहे.

आरोपींनी विनय सुंदरराव नाईक (रा. ताथवडे) यांचे 14 जानेवारी रोजी ताथवडे येथील एका हॉटेलमधून अपहरण केले होते. याप्रकरणी रफिक अल्लाउद्दीन सय्यद (38) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलीस शिपाई दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस मुख्यालयात पोलीस शिपाई पदावर कार्यरत आहे. सध्या तो कर्तव्यावर गैरहजर होता. तो पूर्वी पुणे शहर पोलीस दलात कार्यरत होता. तिथे तो सायबर विभागात काम करत असताना त्याने सेवाअंतर्गत ऑफीस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, एडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टीगेशन टेक्नोलॉजी, बेसीक ऑफ हार्डवेअर अॅण्ड नेटवर्क इंन्फॉरमेशन, मोबाईल फॉरेन्सीक असे कोर्स केले आहेत. तो सायबर क्राईम विभाग पुणे शहर येथे नेमणुकीस असताना त्याला विनय सुंदरराव नाईक यांच्याकडे एकूण 300 कोटी रुपयांची बिट कॉईन ही क्रिप्टो करन्सी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर त्याने विनय नाईक यांचे अपहरण करून पैसे उकलण्याचा डाव आखला.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 जानेवारी रोजी नाईक हे ताथवडे येथील एका हॉटेलमध्ये असताना त्यांचे सात ते आठ अनोळखी इसमांनी अपहरण केले. याबाबत नाईक यांचे मित्र सय्यद यांनी वाकड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत दोन पथके तयार केली. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज गोळा करत तांत्रिक विश्लेषण सुरु केले. दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची कुणकुण आरोपींना लागली. त्यांनी नाईक यांना वाकड भागात सोडले आणि आरोपी पळून गेले. आरोपींनी बिट कॉइन व आठ लाख रुपयांची मागणी केल्याचे नाईक यांनी पोलिसांना सांगितले.

वाकड पोलिसांनी आरोपींचा माग काढत मुंबई गाठली. तिथून चार जणांना ताब्यात घेत त्यांनी अपहरणाची वापरलेली कार पोलिसांनी जप्त केली. अटक केलेल्या आरोपींनी प्रदीप काटे आणि दिलीप खंदारे यांच्या सांगण्यावरून राजेश बंसल आणि शिरीष खोत यांच्यासोबत मिळून हा गुन्हा केल्याची कबुली दिली. नाईक यांचे अपहरण करून त्यांना अलिबाग येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवले आणि त्यांच्याकडे आठ लाख रुपयांची मागणी केली. अन्य तिघांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणाचा मास्टरमाइंड दिलीप खंदारे असल्याचे आरोपींनी सांगितले.

दिलीप खंदारे हा पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांनी खंदारे याला तांत्रिक विश्लेषण करून भोसरी येथून सापळा लावून ताब्यात घेतले. खंदारे याने त्याच्या साथीदारांसोबत मिळून हा गुन्हा सुनियोजितपणे कट रचून केल्याचे कबुल केले. पोलीस उपनिरीक्षक गणेश तोरगल तपास करीत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे, उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे एक) संतोष पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे दोन) रामचंद्र घाडगे, सहाय्यक निरीक्षक संतोष पाटील, सहाय्यक निरीक्षक अभिजीत जाधव, उपनिरीक्षक गणेश तोरगल, सहाय्यक फौजदार बिभीषण कन्हेरकर, बाबाजान इनामदार, राजेंद्र काळे, पोलीस कर्मचारी बापुसाहेब धुमाळ, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दिपक साबळे, बंदु गिरे, अतिश जाधव, प्रमोद कदम, अतिक शेख, प्रशांत गिलबीले, विक्रांत चव्हाण, कल्पेश पाटील, कौंतेय खराडे, अजय फल्ले, नुतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.