नवी दिल्ली : विप्रोमध्ये कार्यरत असतानाच स्पर्धक कंपनीसोबतही काम करताना आढळल्याने विप्रो कंपनीने 300 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. विप्रोचे अध्यक्ष ऋषद प्रेमजी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, कंपनीचे 300 कर्मचारी एकाच वेळी त्यांच्या एका स्पर्धकांसोबत काम करत असल्याचे आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
ऋषद प्रेमजी यांनी मूनलाईटिंगला कडाडून विरोध केला आहे. त्यांनी आपल्या वक्तव्यावर ठाम राहताना मूनलाईटिंग हा पूर्णत: नैतिकतेचे उल्लंघन करणारं असल्याचे म्हटले आहे. ऋषद प्रेमजी यांनी ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या राष्ट्रीय व्यवस्थापन अधिवेशनात बोलताना सांगितले की, वास्तविक काढून टाकण्यात आलेले कर्मचारी आज विप्रोसाठी काम करत असतानाच ते आमच्या प्रतिस्पर्ध्यांपैकी एकाकडे थेट काम करत होते. आम्ही गेल्या काही महिन्यांत 300 लोक शोधले आहेत जे तेच करत होते.
दरम्यान, या निर्णयानंतर NITES चे अध्यक्ष हरप्रित सिंग सलूजा यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. सलूजा यांनी म्हटले आहे की, विप्रोने मूनलाइटिंगच्या नावाखाली सुमारे 300 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणे निराशाजनक आहे. नॅसेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट NITES संस्थेच्या या अनैतिक कृतीचा निषेध करते. आयटी क्षेत्रातील कर्मचार्यांच्या ऑफर लेटरमध्ये नमूद केलेल्या बेकायदेशीर कलमांविरुद्ध कायदेशीर लढाईची तयारी करत असल्याने आम्ही या कर्मचार्यांना पुढे येण्याचे आणि आमच्यात सामील होण्याचे आवाहन केले आहे.
ते पुढे म्हणाले की, ऑफर लेटर आणि एम्प्लॉयमेंट कॉन्ट्रॅक्टमध्ये नमूद केलेल्या कलमांचा न्यायव्यवस्थेने कायदेशीररित्या पुनरावलोकन करणे आवश्यक आहे. कर्मचार्यांना मनमानी पद्धतीने कामावरून काढून टाकणे अनैतिक आणि बेकायदेशीर असून, पीडित कर्मचार्यांना न्याय मिळवून देण्यासाठी NITES युनियन कोणतीही कसर सोडणार नाही.
गेल्या काही दिवसांपासून मूनलाइटिंगबद्दल चर्चा आहे, पण हा प्रकार अगदीच नवीन नाही. पूर्वीपासून हे चालत आलं आहे. मूनलाइटिंग म्हणजेच आपल्याला नोकरीच्या ठिकाणी जे काम नेमून दिलं आहे. म्हणजे तुमचा जॉब समजा10 ते 5 आहे आणि तो तुम्ही पूर्ण केला. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही जे काही काम बाहेर करता त्याला मूनलाइटिंग म्हणतात.
म्हणजेच तुम्ही जॉबनंतर एक्स्ट्रा पैसे कमविण्यासाठी जी धडपड करतात जे कंपनीला माहिती नसते ते मूनलाइटिंग व्याख्येत येते. नावाप्रमाणेच, मूनलाइटिंगचा अर्थ चंद्राच्या प्रकाशाखाली किंवा सामान्य कामकाजाच्या वेळेच्या बाहेर रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी केले जाणारे दुसरे काम.