मुंबई : राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यात ४६ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे तब्बल तीस हजार रुग्ण आढळले असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात नोव्हेंबर महिन्यात २८ हजार ७४, डिसेंबर महिन्यात २५ हजार १७७ आणि जानेवारी महिन्यात २१ हजार ६५ रुग्णांचे निदान झाले होते. या रुग्णसंख्येच्या तुलनेत फेब्रुवारी महिन्याची संख्या पाहता प्रादुर्भाव वाढण्याच्या दृष्टिकोनातून हा सतर्कतेचा इशारा असल्याचे मत टास्क फोर्सचे तज्ज्ञ डॉ शशांक जोशी यांनी मांडले आहे.
मुंबई महानगर परिमंडळाच्या तुलनेत राज्यात विदर्भातील वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय आहे. याविषयी डॉ. जोशी यांनी सांगितले, मागील दोन आठवड्यांत दैनंदिन रुग्णसंख्येत आणि गंभीर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी, यंत्रणांसह सामान्य नागरिकांनीही हा सतर्कतेचा इशारा मानून करुणाविषयक मार्गदर्शक नियमांचे पालन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
मागील दोन महिन्यांत या नियमांविषयी सामान्य नागरिकांमध्ये आलेली शिथिलता हे संसर्गवाढीचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे स्थानिक पातळीसह राज्य शासनाने या नियमांच्या अंमलबजावणीकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे.