सराईत गुन्हेगाराची अंत्ययात्रा प्रकरणी ३३ जणांना पोलिस कोठडी

0

पुणे : बेकायदा जमाव जमवून सराईत गुन्हेगाराच्या अंत्ययात्रेसाठी दुचाकी रॅली काढल्या प्रकरणी सत्र न्यायालयाने ३३ आरोपींना ३० मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी हा आदेश दिला आहे.
अटक आरोपींना सुरुवातीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. तेव्हा त्यांना पाच दिवसांच्या पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, प्रथमवर्ग न्यायंडाधिकारी यांनी ही मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या निकालाविरोधात पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेत सरकारी वकिलांमार्फत फौजदारी पुनर्विचार याचिका दाखल केली होती. सत्र न्यायालयाने ती स्वीकारून आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक परशुराम वनप्पा पिसे यांनी फिर्याद दिली आहे.

सराईत गुन्हेगार माधव हनुमंत वाघाटे याचा १६ मे रोजी बिबवेवाडी परिसरात खून झाला होता. त्याच्यावर कात्रज स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी वाघाटेच्या दीडशे ते पावणेदोनशे साथीदारांनी करोना प्रतिबंधक नियम डावलून दुचाकीवरून बालाजीनगरमधून सातारा रस्तामार्गे कात्रज स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रेत सहभाग घेतला. त्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. पण वाघाटेच्या साथीदारांनी त्यांना न जुमानता जोरजोराने ओरडत नाकाबंदीवरील बॅरिकेड मोडून भरधाव वेगाने गाड्या चालविल्या. लॉकडाउन असताना स्मशानात गर्दी केली होती, तसेच मास्क, सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन केले नव्हते, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रल्हाद पासलकर या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

… तर पोलिसांच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होईल
आरोपींनी करोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे, तसेच बॅरिकेडची मोडतोड केली आहे. अशा प्रकारांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत निर्माण होत आहे. आरोपींची चौकशी केली नाही आणि त्यांना जामीनावर सोडले तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि प्रामाणिक तपास व पोलिसांच्या मनोधैर्यावर त्याचा परिणाम होईल. या प्रकरणाचा योग्य तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी केला.

Leave A Reply

Your email address will not be published.