मुंबई : कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडात झाला होता. यामुळे महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
महसूल विभागाने राबाविलेलेल्या या योजनेमुळे सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत २०१९ च्या तुलनेत दस्तनोंदणीत ४८ टक्के तर राज्याच्या महसुलात ३६७ कोटी रुपयांची वाढ झाली. त्यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेने व उद्योगक्षेत्राने गती पकडली असल्याचेही ते म्हणाले.
बांधकाम क्षेत्रात आलेली मंदीचे सावट दूर करुन या क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच घर खरेदी करणारे या दोघांचे हित लक्षात घेऊन मुद्रांक शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन मरगळलेल्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली.
डिसेंबर २०१९ मध्ये २ लाख ३९ हजार २९२ दस्तनोंदणीसह २ हजार ७१२ कोटींचा असलेला महसूल डिसेंबर २०२० मध्ये तब्बल ४ लाख ५९६०७ दस्त नोंदणी होऊन ४ हजार ३१४ कोटींचा महसूल प्राप्त झाला, डिसेंबरमधील दस्त नोंदणीत तब्बल ९२ वाढ टक्के तर महसूलात ५९ टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात २०१९ साली ८ लाख ४४ हजार ६३६ दस्त नोंदणी होऊन महसूल ९ हजार २५४ कोटी रुपये मिळाला होता. तर २०२० मध्ये सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यात १२ लाख ५६ हजार २२४ दस्त नोंदणी झाली आणि ९ हजार ६२२ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला. या चार महिन्यात दस्त नोंदणीत ४८ टक्के वाढ तर महसुलात ३.९७ टक्के वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.