पुणे : मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या एका संशयित कार मधून पुणे ग्रामीण पोलिसांच्या लोणावळा ग्रामीण पोलिसांनी चार कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन अवैध शस्त्र व पैशांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती पुणे ग्रामिण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.28) रात्री ही कारवाई करण्यात आली.
महेश नाना माने (रा. विटा. जि. सांगली), विकास संभाजी घाडगे (रा. शेटफळ, जि. सांगली) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावरुन अवैध शस्त्र व पैशांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी रात्री महामार्गावर पथक तैनात करण्यात आले. मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एका संशयित स्विफ्ट कार (KA 53 MB 8508) ताब्यात घेण्यात आली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता कारमध्ये चार कोटी रुपयांची रोख रक्कम सापडली. ही सर्व रक्कम पाचशे रुपयांच्या चलनात आहे.
पैशांबाबत कार चालक महेश माने आणि विकास घाडगे यांच्याकडे चौकशी करण्यात आली. त्यांनी एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेत होते. तसेच आवश्यक कागदपत्रे आणि वाहतुक परवाना बाबत आरोपींनी समाधानकारक कारण दिले नाही. याप्रकरणी हवालाचा प्रकार आहे का याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान या रक्कमेसंदर्भात पोलिसांनी आयकर विभागाला माहिती दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे, गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने केली.