पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठीच्या दुसर्या विशेष फेरीत प्रवेश घेण्यासाठी 17 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.
आतापर्यंत 71 हजार 154 विद्यार्थ्यांनी विविध महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला आहे, तर प्रवेशासाठी अद्यापही 40 हजार 76 जागा उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार का? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.
अकरावी केंद्रीय प्रवेश समितीद्वारे पुणे, पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नागपूर, अमरावती, नाशिक या महानगर क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार या प्रवेश प्रक्रियेत तीन नियमित आणि दोन विशेष फेर्या राबविण्यात आल्या आहेत. दुसर्या विशेष फेरीची गुणवत्ता यादी 15 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली होती.
या यादीत 6 हजार 737 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला होता. संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 17 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती, तर 18 सप्टेंबरपासून पुढील फेरीसंदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने वेळापत्रकात नमूद केले होते.
यंदा कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 11 हजार 230 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यापैकी 94 हजार 944 जागा केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे भरल्या जाणार आहेत. परंतु, यातील केवळ 61 हजार 880 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, कॅपमधीलच तब्बल 33 हजार 64 जागा रिक्त आहेत, तर कोटा प्रवेशासाठी यंदा 16 हजार 286 जागा उपलब्ध होत्या.
त्यापैकी 9 हजार 274 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, कोटा प्रवेशाच्या देखील 7 हजार 12 जागा रिक्तच असल्याचे दिसून येत आहे. अकरावी प्रवेशाची एकंदरीत परिस्थिती पाहता दरवर्षी 20 हजारांच्या आसपास जागा रिक्त राहतात. यंदा मात्र 40 हजारांहून अधिक जागा रिक्त आहेत. यापुढे प्रवेशाच्या एक किंवा दोन फेर्या राबविल्या जातील. त्यामध्ये 5 हजार जागा जरी भरल्या, तरी यंदा मात्र 35 हजारांवर जागा रिक्तच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एकूण महाविद्यालये – 316
एकूण प्रवेशक्षमता – 1,11,230
एकूण नोंदणी – 1,06,830
कोटा प्रवेशक्षमता – 16,286
कोटांतर्गत प्रवेश – 9,274
कॅप प्रवेशक्षमता – 94,944
कॅपअंतर्गत अर्ज – 73,462
एकूण प्रवेश – 71,154
रिक्त जागा – 40,076