पुणे : गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा व्याजदराचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधिश के.पी. नांदेडकर यांनी जामीन फेटाळून लावला आहे. आरोपीने ठेविदारांची ४६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड आहे.
पंकज भागचंद छल्लाणी (वय ४६, रा. मुकुंदनगर) असे जामीन अर्ज फेटाळलेल्या आरोपीचे नाव आहे. छल्लाणी हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला पाच जानेवारी रोजी अटक करण्यात आली होती. रिचर्ड वसंत अंची (वय ५८, रा. भोसलेनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा रस्त्यावरील टाईम्स स्क्वेअर इमारतीमधील कार्यालयात नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला. आरोपीने फिर्यादींना गुंतवलेल्या रकमेवर 18 ते 24 टक्के व्याज देण्याचे आमिष दाखविले. तसेच नोव्हेंबर 2014 ते सप्टेबर 2018 या कालावधीत 65 लाख रूपये ठेव म्हणून घेतले. तसेच मार्च 2018 पासून ठेव रक्कम व त्यावरील व्याज न देता फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
आरोपीने 56 गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असून 43 कोटी 3 लाख 42 हजार 133 रूपयांची फसवणूक केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. तसेच फसवणूकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. पंकज छल्लाणीवर एम.पीआय.डी न्यायालय शिवाजीनगर येथे मार्च 2021 मध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच त्याच्याविरोधात दत्तवाडी पोलिसातही फसवणूकीचा गुन्हा दाखल आहे.
फॉरेन्सिक ऑडीटरची नेमणूक :
आरोपीने अपहार केलेली रक्कम कोठे गुंतविली आहे याचा तपास करणे, स्वत:च्या तसेच कुटुंबियाच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे का? याबाबत माहिती मिळविण्यासाठी मुद्रांक नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. इतर आरोपींचा शोध घेणे तसेच हा गुन्हा आर्थिक घोटाळ्याचा तसेच व्यापक स्वरूपाचा असल्याने फॉरेन्सिक ऑडिट व डिजिटल फॉरेन्सिक ऑडिट होणेकरिता फॉरेन्सिक ऑडीटरची नेमणूक करण्यात आली आहे. पुढील तापासाठी आरोपीचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद सरकारी वकिल मारूती वाडेकर यांनी केला. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती देसाई या करीत आहेत.